राजापूर : प्रतिनिधी
दि. १७ मे. : सुमारे पाचशे किलोमिटर लांबीच्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात राजापूर शहरानजीक शीळ-कोंढेतड या दरम्यान अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या सर्वाधिक उंचीच्या पुलाचे काम मार्गी लागले असून हा पुल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.या पुलामुळे राजापूरच्या मुळ निसर्ग सौंदर्यात भर पडली असून या पुलावरून मार्गक्रमण करताना आनंददायी सफरीचा वेगळाच अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे. तर महामार्गावरील सर्वाधिक उंचीच्या या पुलामुळे राजापूरची एक नवी ओळख राज्य आणि देशवासियांना होणार आहे. लवकरच या पुलाच लोकार्पण् सोहळा होणार आहे.
नोव्हेंबर २०१८ मध्ये या पुलाच्या प्रत्यक्ष उभारणीला प्रारंभ झाला होता. मात्र भुसंपादनातील अडचणी आणि कोरोना काळात कामात आलेली शिथीलता यामुळे हा पुल मार्गी लागण्यास मे २०२२ साल उजाडले आहे.