जयसिंगपूर : विजय घंगेकर
दि.18: जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह राबविण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. महावीर सिंग चौहान आणि संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी दानोळी परिसरातील सार्वजनिक ठिकाणे, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, बस स्थानक परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, नदीघाट, दानोळी येथील देवराई वनक्षेत्र या ठिकाणी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण कार्यक्रम आणि पर्यावरणाचे संवर्धन या विषयी विविध उपक्रम राबविण्यात आले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक यांच्यावतीने स्वच्छता आणि पर्यावरण जनजागृती साठी पोस्टर्स बनवण्यात आले होते. स्वच्छता अभियानासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. दादासाहेब मगदूम यांनी स्वयंसेवकांना स्वच्छतेचे महत्त्व तसेच राज्य आणि केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छतेबाबत असणारे उपक्रम व त्यांची अंमलबजावणी करत असताना स्वयंसेवकांनी करावयाचे कार्य याबाबत माहिती दिली. पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहित केले. स्वयंसेवकांनी अतिशय उत्कृष्टपणे परिसर स्वच्छ करून कचऱ्याची विल्हेवाट लावली. तसेच परिसरातील कचऱ्याची वर्गवारी करून कचरा नष्ट करण्याचा सल्ला देताना लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. माणगावे, उपप्राचार्य प्रा. एस. एच. फलके यांनी स्वच्छता अभियान आणि पर्यावरण जनजागृती या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.