कबनूर :प्रतिनिधी
ता. २०जून :येथील गंगानगर ते कबनूर या रस्त्यावरील कोपऱ्या नजिक असलेला श्री रेणुका शुगर्सचा बगॕस वाहून नेणारा ओव्हर ब्रीज मे. उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे तात्काळ काढण्याची कारवाई करावी अशी मागणी कबनूरचे माजी उपसरपंच निलेश पाटील यानी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निलेश पाटील म्हणाले, श्री रेणुका शुगर्स ने येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना कार्यस्थळावर को-जनरेशन प्रकल्प सुरु केला असून या प्रकल्पासाठी बगॕस पुरवण्यासाठी बगॕस यार्ड केले आहे. तेथून ओव्हर ब्रीजने प्रकल्पाला बगॕस पुरवला जातो. हा ब्रीज गंगानगर – कबनूर रस्त्यावर उंचावर असल्याने या ब्रीज खालून जाणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात बगॕस जाऊन डोळ्यांचे गंभीर आजार होत आहेत. अपघातामध्ये वाढ झाली आहे. हा ओव्हर ब्रीज धोकादायक असल्याने सुरेश गडगे यानी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल लागून चार वर्षे झाली तरी श्री रेणुका शुगर्सने त्या निकालाची अद्याप अंमलबजावणी केली नाही. उलट जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागास खोटी कागदपत्रे देवून ओव्हर ब्रीज काढण्यास व बगॕस युनिट हलविण्यास विलंब लावत आहे. त्यामुळे रेणुका व्यवस्थापनाने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. तरी त्यांचेवर कारवाई करावी असे म्हंटले आहे. याउपरही रेणुका शुगर्सने ओव्हर ब्रीज काढण्याची व बगॕस युनिट तेथून हलविण्याची कार्यवाही तात्काळ न केलेस उच्च न्यायालयात त्यांचे विरुध्द अवमान याचिका दाखल करणार असल्याचेही निलेश पाटील यानी सांगितले.