देवरुख : अजित गव्हाणकर
दि. २८ : महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या महिलेचे कुंकू पुसले जाते, हाता मधला हिरवा चुडा फोडला जातो . सौभाग्याचे सगळेच अलंकार सामाजिक दृष्टिकोनातून हिसकावून घेतले जातात. या सामाजिक प्रथा बंद करणे कायद्याच्या आणि समाजाच्या दृष्टिकोनातून गरजेचे आहे. सामाजिक दृष्टिकोनातून विधवा स्त्रियांना कोणत्याही मंगल कार्यक्रमात बोलवले जात नाही, त्यांचा उचित मानसन्मान केला जात नाही. भारतीय समाजातील कोणत्याही महिलेला कायद्यानुसार योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे आणि याची सुरुवात गाव खेड्यातून झाली पाहिजे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतीना आदेश दिले आहेत की, विधवा प्रथा बंद करण्यात याव्यात याची दखल घेऊन कोकणातील नाणीज, दापोली या ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्या आहेत. याचा बोध घेऊन मौजे तळेकांटे गावातील विधवा प्रथा तळेकांटे ग्रामपंचायतीने बंद करावी आणि सामाजिक आदर्श घडवावा यासाठी सरपंच सुरेश तुकाराम गुरव यांना ग्रामपंचायत सदस्य आयु अमोल प्रभाकर कांबळे यांच्या कडून विनंती वजा निवेदन देण्यात आले आहे. अमोल कांबळे यांचा सामाजिक उपक्रमामध्ये कायमच हातखंडा असून ते सर्वात कमी वयात ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत.