राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त मानबेट येथे शालेय साहित्य व सायकलींचे वाटप

इचलकरंजी -प्रतिनिधी
दि. ३०जून : मानबेट सह्याद्री कृषी पर्यटन केंद्र आणि बीएमडब्ल्यू ग्रुप यांच्या वतीने मानबेट (तालुका राधानगरी) येथील इयत्ता 5 वी ते 10 वी मधील विद्यार्थी-विद्यार्थीनींना सायकली आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
राधानगरी तालुक्यातील मानबेट हे दुर्मिळ आणि डोंगर दरीत वसलेले गाव. या गावातील मुलांना शालेय शिक्षणासाठी गावापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर दुसर्‍या गावात जावे लागते. अतिशय दुर्गम भाग असलेल्या या गावातील विद्यार्थी-विद्यार्थीनींची गरज दररोज होणारी पायपीट ओळखून मानबेट सह्याद्री कृषी पर्यटन केंद्र आणि बीएमडब्ल्यू ग्रुप यांच्या वतीने 24 विद्यार्थी-विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य प्रदान करण्यात आले.
मानबेट ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  अ‍ॅड. अशोक तांबे होते. तर गगनबावड्याचे पोलिस निरिक्षक रणजित पाटील, मानबेट सह्याद्री कृषी पर्यटन केंद्राचे संस्थापक सुरेशदादा पाटील, केडीसीसी बँकचे संचालक अर्जुन आबिटकर, दानशूर विनय मगदूम, उद्योगपती शैलेश सातपुते, अ‍ॅड. आण्णा चुडमुंगे, डॉ. सिमोन आवळे, बीएमडब्ल्यू ग्रुपचे सर्व पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते. मानबेटचे सरपंच शिवाजी गोरुले यांनी आभार मानले.