साखरपा:
सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सातत्याने आघाडीवर असणाऱ्या साखरपा नजीकच्या भडकंबा गावची ग्रामसभा आज पार पडली.या विशेष ग्रामसभेत गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव केला.आता या गावात विधवेचे ना कुंकू पुसले जाणार,ना बांगडी फोडली जाणार,ना जोडवी काढली जाणार,सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला आणि विधवा प्रथा बंद करुन भडकंबा गावाने जिल्ह्यासमोर नवा आदर्श निर्माण केला.विधवा प्रथेसारखी अत्यंत वाईट व अनिष्ट असणारी प्रथा या गावाने मोडीत काढली आहे.ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला.राज्यात निरनिराळ्या गावापाठोपाठ भडकंबा गावाने जिल्ह्यात तिसरा क्रमांक व तालुक्यात दुसरा विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केल्याने गावकऱ्यांचे कौतुक होत आहे.या ग्रामसभेला कार्यतत्पर सरपंच बापू शिंदे यांनी विधवा प्रथा बंदीची संकल्पना मांडली व त्याविषयची इत्यंभूत माहिती ग्रामसभेला दिली.या आधी काही दिवस गावातील सर्व वाडीमध्ये जाऊन ज्येष्ठ गावकरी,मानकरी यांचेशी चर्चा केली.यामध्ये प्रामुख्याने सरपंच बापू शिंदे,मा.सरपंच शेखर आकटे,सदस्य बाळू जामसंडेकर,केतन दुधाने,अंतरा भोसले,जयश्री मांडवकर,सुरेश कटम,कमलेश म्हावळणकर,सिध्दी कटम,संजय नवले,अजमीना रामदुल व प्रतीक्षा नवाले हे सर्व विशेष मेहनत घेत होते.भडकंबा गाव कायम सामाजिक,राजकीय,क्रीडा,कला व शिक्षण क्षेत्रात कायम अग्रेसर राहिले आहे.
या गावात आता विधवेची ना बांगडी फुटणार,ना कुंकू पुसले जाणार,ना जोडवी काढली जाणार,विधवा महिलांनाही सन्मानाने जगता यावं व सामाजिक,धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता यावं,यासाठी गावकऱ्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण मंडळीं व महिलावर्ग एकत्रित येत हा निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतला.कायद्याने समानतेचा अधिकार सर्वांना दिला आहे.पतीच्या निधनानंतर विधवा महिलेने सर्वस्वच गमावलेलं असतं.अशातच तिच्या अंगावरील सौभाग्याचे अलंकार काढणे,तिच्या कपाळावरचं कुंकू पुसणे,जोडवी काढणे हे अत्यंत क्लेशदायक आहे.गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींनी आपण मांडलेल्या भूमिकेचे स्वागत केले आणि सर्वांनी एकमताने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी शिक्षिका प्रभा जाधव,शेंडे मॅडम,रसिका शिर्के,अर्चना कांबळे,मीरा लोध,मधु आठल्ये,आबा कानिटकर,जावेद साठविलकर,दाभोळकर व सुमारे 125 ते 140 ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच बापू शिंदे यांनी यावेळी ही संकल्पना मांडत एक नवा आदर्श निर्माण केला.यावेळी त्यांनी त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानले.गावच्या एकजुटीचे कौतुक केले.कायमच आमचा गाव विधायक कामात अग्रेसर असतो आणि राहील असा आशावाद व्यक्त केला.