जयसिंगपूर : विजय धंगेकर
दि. 17 ऑगस्ट :जैनापुर येथील शरद कृषि महाविद्यालयमधील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त केंद्र सरकार व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या द्वारे “हर घर तिरंगा” ही मोहीम राबवून जनतेमध्ये जनजागृती करण्याकरता आदर्श गाव येथे गावातील सर्व प्रमुख चौकातून तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी राष्ट्रध्वज हाती घेऊन गावातून प्रभात फेरी काढून गावातील प्रत्येक घरात व नागरिकांना तिरंग्याबद्दल घ्यावयाची दक्षता याबद्दल मार्गदर्शन तसेच माहिती पत्रक वाटप करण्यात आले.
यानिमित्ताने महाविद्यालयांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाहुबली डी. माणगावे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभक्तीच्या विविध घोषणा देत राष्ट्रभक्तीचा परिचय दिला.
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयामध्ये ‘सेंद्रिय शेती’ या विषयावर कृषि महाविद्यालय कोल्हापूरचे प्रा. डॉ. जगदीश पाटील यांचे व्याख्यान झाले. तसेच या महोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयामध्ये वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या महोत्सवाला संस्थेचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांचेकडून प्रोत्साहान मिळाले. हा महोत्सव यशस्वी करण्याकरिता विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. सचिन तोडकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दादासाहेब मगदूम यांनी परिश्रम घेतले.