अदानी पॉवरच्या वीज खरेदीचा इतिहास, विविध प्रश्न आणि गौडबंगाल

वीजतज्ञ प्रताप होगाडे

इचलकरंजी : संजय आंबे

दि. १७ ऑगस्ट :महावितरण कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व २.८७ कोटी वीज ग्राहकांवर इंधन समायोजन आकार या नांवाखाली २० टक्के दरवाढ लादलेली आहे. ही दरवाढ अदानी पॉवर लिमिटेडचे देणे देण्यासाठी म्हणूनच लावण्यात आलेली आहे हे आता स्पष्ट झालेले आहे.

    अदानी पॉवर कंपनीला कायद्यातील बदल (Change in Law) या प्रकरणी झालेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, विद्युत अपिलीय प्राधिकरण, नवी दिल्ली व सर्वोच्च न्यायालय यांच्या निकालांच्या आधारे  एकूण २२३७४ कोटी रुपये दिले जात आहेत. यापैकी ६९५८ कोटी रुपये ऑगस्ट २०२१ अखेर व त्यानंतर १४५८ कोटी रुपये डिसेंबर २०२१ अखेर इंधन समायोजन आकार निधीमधून म्हणजेच ग्राहकांकडून वसूल केलेल्या रकमेतून दिलेले आहेत. आता जुलै ते नोव्हेंबर २०२२ या ५ महिन्यांच्या बिलामधून ६२५३ कोटी रुपये दिले जाणार आहेत आणि त्यानंतर एप्रिल २०२३ पासूनच्या बिलांमधून उर्वरीत ७७०८ कोटी रुपये वसूल करुन दिले जाणार आहेत. ही एकूण २२३७४ कोटी रुपये रक्कम वीज ग्राहकांवर लादली गेली आहे. या रकमेमध्ये कॅरिंग कॉस्ट (Carrying Cost) या नावाखाली लागलेले व्याज ६०५३ कोटी रुपये ही रक्कम सामाविष्ट आहेअदानी पॉवर लिमिटेड यांच्याकडून इ. स. २०१२-१३ ते इ.स. २०१८-१९ या ७ वर्षांच्या कालावधीमध्ये एक लाख ६४९ दशलक्ष युनिट्स वीज खरेदी करण्यात आली आहे. या वीज खरेदीपोटी ३५६५६ कोटी रुपये आधीच देण्यात आलेले आहेत. म्हणजेच ही वीज खरेदी ३.५४ रुपये प्रति युनिट या दराने करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता पुन्हा त्याच वीजेसाठी व्याजासह २२३७४ कोटी रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच प्रति युनिट २.२२ रुपये पुन्हा दिले जात आहेत. म्हणजेच एकूण खरेदी दर ५.७६ रुपये प्रति युनिट या दराने ही वीज खरेदी केली गेलेली आहे…महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये इतकी महागडी वीज अदानी पॉवर कंपनीशिवाय कोणीही विकलेली नाही आणि महावितरण कंपनीशिवाय कोणीही खरेदी केलेली नाही.

प्रश्न असा निर्माण होतो हा सर्व घोटाळा आणि हे सर्व गौडबंगाल नेमके काय आहे याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात अशी माहिती वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली