हातकणंगले : अब्दुल नदाफ
दि. १८ ऑगस्ट :संजय घोडावत विद्यापीठाच्यावतीने महाराष्ट्र राज्य कुमारी गट कबड्डी संघासाठी सराव शिबीर १६ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या दरम्यान आयोजित केले आहे. ४८ वी कुमारी गट राष्ट्रीय अजिक्यपद कबड्डी स्पर्धा १ सप्टेंबर ते ४ सप्टेबर २०२२ या कालावधीत पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पटना, बिहार येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुमारी गट कबड्डी संघ निवडीसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व संजय घोडावत विद्यापीठाच्या सहकार्याने हे सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये २१ खेळाडू सहभागी झाले आहेत. या २१ खेळाडूंमधून अंतिम १२ खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. ते खेळाडू थेट महाराष्ट्र संघांचे प्रतिनिधित्व करणार आहेत अशी माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली. यावेळी कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, प्राचार्य विराट गिरी, क्रीडा प्रशिक्षक महेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.