कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. २ सप्टेबर :- अटक वॉरंट कामकाजात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 2 हजाराची लाच मागणार्या हातकणंगले पोलिस ठाण्यातील पोलीस नाईक नामदेव औदुंबर कचरे वय 36 मुळ रा.उचगाव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराची कर्नाटकातील धारवाड येथे कौटुंबिक न्यायालयात खटला सुरु आहे. या खटल्याच्या तारखेस तक्रारदार गैरहजर असलेने न्यायालयाने त्यावर अटक वॉरंट काढले होते. सदर अटक वॉरंट कामकाजात मदत करण्यासाठी पोलीस नाईक कचरे यांनी तीन हजाराची लाच मागितली होती. तडजोडी अंती दोन हजार देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत विभाग कोल्हापूर यांचेकडे या संदर्भाची तक्रार केली. पोलीसांनी याची खातरजमा केली त्यानंतर शुक्रवारी सापळा रचून पोलीस ठाण्याच्या बाजूस रेल्वे स्टेशनकडे जाणार्या रस्त्यावर तक्रारदाराकडून 2 हजाराची लाच स्विकारताना पोलीस नाईक कचरे यास रंगेहाथ पकडले. पोलीस ठाण्याच्या आवारात सदरची घटना घडली. कचरे याच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी कचरे याला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, संजू बंबर्गेकर, हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, विकास माने, सुनिल घोसाळकर, नवनाथ कदम, कॉ.मयुर देसाई, हेड.कॉ. विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली.