कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 14 : तरुण- तरुणींनी लघुउद्योग सुरु करुन उद्योग क्षेत्राकडे वळावे. तरुणांनी व्यवसाय सुरु करण्याचे धाडस करुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन नवउद्योजकांना प्रशासनाच्यावतीने कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला.
उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विशेष संकल्पनेतून जिल्ह्यात विविध बँका, शासकीय विभाग, महामंडळे, नाबार्ड यांच्याद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गेले महिनाभर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचा सांगता समारंभ शाहूवाडी तालुक्यात पंचायत समिती सभागृहात झाला, याप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, तरुणांनी नाविन्यपूर्ण विचार करुन व्यवसाय करण्याचे धाडस दाखवावे. पारंपरिक ऊस शेती न करता आधुनिक शेती करावी. रेशीम उद्योगाकडे वळावे. उद्योगाला चालना देण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक तालुक्यातील तरुणाला उद्योगाची संधी निर्माण व्हावी, या उद्देशाने तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासन कमी पडणार नाही, अशी खात्री जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिली.
सर्व तालुक्यामध्ये जिल्ह्यातील बँका, शासकीय विभाग व महामंडळ यांच्याशी योग्य समन्वय साधून अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सर्व तालुक्यातील मेळाव्यांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी त्यांचे अभिनंदन केले. या मेळाव्यास 1300 हून अधिक तरुण-तरुणी, महिला उद्योजकांसह नवउद्योजक उपस्थित होत
या प्रसंगी बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यासह सर्व शासकीय महामंडळे, कृषी विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, आरसेटी, बचत गट आदींचे स्टॉल लावण्यात आले होते. प्रत्येक विभागाच्यावतीने संबंधिताना योग्य माहिती देण्यात आली. यावेळी बँक ऑफ इंडिया शाहूवाडी शाखेद्वारे बचत गटांना 21 लाखाचे व पीएमइजीपी व मुद्रा अंतर्गत 31 लाखांचे कर्ज मंजुरीचे धनादेश वाटप करण्यात आले. भात पिक स्पर्धेत कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त विनोद बेर्डे यांचा यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.