नौकाभ्रमण मोहिमेचे सांगता समारंभ संपन्न

 

रत्नागिरी दि. २४ : २ (सेकंड) महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनीटतर्फे १५ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत नौकाभ्रमण मोहिमेचे आयोजन केले होते.  या मोहिमेचा सांगता समारंभ आज भगवती जेटी, रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. प्लास्टीकमुक्त सागर असा संदेश देत ही मोहीम राबविण्यात आली. काळबादेवीतून नौका वल्हवत व वाऱ्याच्या दिशा सांभाळत आज सकाळी तीन नौका व ६० छात्र भगवती बंदर येथे पोहोचले. त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यावेळी म्हणाले युवा वयात तुम्हाला मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग करून घ्या.युपीएससी परीक्षा द्याल तेव्हा अशा प्रशिक्षणाची चांगली संधी आहे. विद्यार्थ्यांनी अष्टपैलू व्हावे तसेच आयपीएस होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सर्व एनसीसी छात्रांचे यावेळी अभिनंदन केले.

जिल्हाधिकाऱ्यांना जहाजाची प्रतिकृती देऊन कमांडिंग ऑफिसर के. राजेश कुमार यांनी सन्मानित केले.

मोहिमेदरम्यान भगवती बंदर, वरवडे, जयगड, तवसाळ, बोऱ्या, दाभोळ, धोपावे अंजनवेल, वेलदूर, काळबादेवी या बंदरांना भेट दिली. समुद्रात १७७ नॉटिकल मैल अंतर पार करण्यात आले. यात नेव्ही, आर्मी, एअरफोर्सच्या छात्रांचा समावेश होता.

याप्रसंगी २ महाराष्ट्र नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर के. राजेश कुमार (भारतीय नौसेना) यांनी या मोहिमेतसंदर्भातील माहिती सांगितली. एनसीसीचे ३५ छात्र व २५ विद्यार्थिनी छात्र यात सहभागी झाल्या. दहा दिवसांत ३० पथनाट्ये सादर करण्यात आली. लाटा व वाऱ्याशी सामना करत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असल्याचे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, भरती ओहोटी, वाऱ्याचा विचार करून नौका वल्हवत पुढे जाणे आणि समुद्रातील कोणत्याही संकटाशी सामना करण्याकरिता सज्ज राहणे यासाठी ही मोहिम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे एनसीसी छात्रांनी मनोगतामध्ये सांगितले.

बोट पुलिंग बद्दल कॅटेड कॅप्टन विवेक कोलते आणि कॅडेट सार्जंट श्रुती शुक्ला यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिल्ड देऊन गौरवण्यात आले.

13