MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा

दिव्याची आघाडी कायम, मेरी द्वितीय स्थानावर तर भक्ती आणि वंतिका तृतीय स्थानावर आज अंतिम फेरी

कोल्हापूर :प्रतिनिधी 

 दि ,४जानेवारी :- अतिग्रे ता .हातकणगले ,येथील  घोडावत युनिव्हर्सिटी येथे चालू असलेल्या MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या दहाव्या फेरीनंतर गतविजेती नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख साडेआठ गुणासह आघाडीवर आहेत. चौथी मानांकित पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्स आठ गुणांसह द्वितीय स्थानावर आहे. अग्रमानांकित महिला ग्रँडमास्टर दिल्लीची वंतिका अग्रवाल व पाचवी मानांकित अर्जुन पुरस्कार विजेती गोव्याचे आंतरराष्ट्रीय मास्टर भक्ती कुलकर्णी या दोघी साडेसात गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.सातवी मानांकित कोल्हापूरची महिला मास्टर ऋचा पुजारी, आठवी मानांकित औरंगाबादची महिला ग्रँडमास्टर साक्षी चितलांगे, नववी मानांकित महिला मास्टर कर्नाटकची ईशा शर्मा, दहावी मानांकित पश्चिम बंगालची महिला मास्टर अर्पिता मुखर्जी, 14 वी मानांकित पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची आंतरराष्ट्रीय मास्टर निशा मोहता, पंधरावी मानांकित महिला ग्रँड मास्टर तामिळनाडूची व्ही. वर्षीणी, 17 वी मानांकित मुंबईची महिला फिडे मास्टर विश्वा शहा व 21 वी मानांकित केरळची महिला फिडे मास्टर निम्मी जॉर्ज या आठ जणी सात गुणांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.


आज गुरुवार सकाळी साडेनऊ वाजता अंतिम अकरावी फेरी सुरु होणार आहे. अंतिम फेरी पूर्ण झाल्यानंतर स्पर्धेचा बक्षीस समारंभ दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी सुरु होणार आहे.बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे संजय घोडावत युनिव्हर्सिटी चे चेअरमन उद्योगपती संजय घोडावत व ध्यानचंद पुरस्कार विजेते ग्रँडमस्टर अभिजीत कुंटे व संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य मोहंती मॅडम यांच्या हस्ते होणार आहे.
पहिल्या पटावरील गतविजेती नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख व कर्नाटकची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ईशा शर्मा यांच्यातील लढत लक्षवेधक ठरली. ईशाने रचलेल्या राजासमोरील प्याद्याच्या चालीस दिव्याने पेट्रॉफ डिफेन्सचा अवलंब करत प्रत्युत्तर दिले. दोघींनीही आक्रमक चाली करत डावावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. ३० व्या चालीला दिव्याने डाव बरोबरीत सोडवत अर्ध्या गुणाची आपली आघाडी कायम राखत विजेतेपदाकडे वाटचाल सुरु ठेवली आहे.
दुसऱ्या पटावरील सामन्यात चौथी मानांकित पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्स हिने बाजी मारत आपले आव्हान टिकवून ठेवत स्पर्धेत अंतिम फेरीत चुरस निर्माण केली. तामिळनाडूच्या महिला ग्रँडमास्टर श्रीजा सेशाद्रीविरुद्ध काळ्या मोहऱ्या घेऊन खेळणाऱ्या मेरीने लंडन सिस्टीमचा वापर करत सुरेख व्यूहरचना आखत श्रीजाला दडपणात आणले. श्रीजाने ३२ व्या चालीला केलेल्या उंटाच्या चुकीचा चालीचा अचूकरित्या फायदा घेत हत्ती व वजीराच्या नेत्रदीपक चाली रचत ४४ व्या चालीला श्रीजावर मात करत दिमाखात विजय मिळवला.
अग्रमानांकित दिल्लीची महिला ग्रँडमास्टर वंतिका अग्रवाल व तृतीय मानांकित पेट्रोलियम स्पोर्ट्सच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथन यांच्यातील लढत बेनोनी प्रकाराने झाली. अतितटीच्या या लढतीत डावावर वर्चस्व राखणाऱ्या वंतिकाने हत्ती व वजीराच्या कल्पक चाली करत सौम्याच्या राजावर जोरदार आक्रमण करत हत्तीचे सुंदर बलिदान देत ४१ व्या चालीला विजय संपादन केला.
तामिळनाडूची महिला ग्रँडमास्टर व्ही. वर्शिनी व महाराष्ट्राची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर साक्षी चितलांगे यांच्यातील चुरशीच्या सामन्यात डावात समतोल स्थिती असताना दोघींनीही कोणताही धोका न पत्करता लढत बरोबरीत सोडवत सात गुणांसह स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे.
अर्जुन पुरस्कार प्राप्त गोव्याच्या आंतरराष्ट्रीय मास्टर भक्ति कुलकर्णीने उत्कृष्ट डावपेच आखत रेल्वेच्या महालक्ष्मीला पराभूत केले. कारोकान डिफेन्सने रंगलेल्या लढतीत भक्तीने प्याद्याचा बळी देत महालक्ष्मीच्या राजाकडील बाजू कमकुवत केली. भक्तीने घोडा व घोड्याच्या अप्रतिम चाली रचत महालक्ष्मीला निष्प्रभ करत बचावाची कोणतीही संधी न देता ४१ व्या चालीला आकर्षक विजय मिळवीत पूर्ण गुण वसूल करत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
तसेच राजस्थानच्या दक्षिता कुमावत हिने आयुर्विमा महामंडळाची महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटेचा तर तामिळनाडूच्या फेमील चेल्लादुराई हिने महाराष्ट्राची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आश्ना मखीजास पराभूत करत स्पर्धेत खळबळजनक निकाल नोंदविला. तेलंगणाची सई पोटलुरी व महाराष्ट्राची सानिया तडवी या युवा खेळाडूंनी अनुक्रमे महाराष्ट्राची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर मृदल देहनकर व गुजरातची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर तेजस्वीनी सागर या मातब्बर खेळाडूंना बरोबरीत रोखत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाळेत चेस ईन स्कूल उपक्रम सुरु असलेल्या इचलकरंजी येथील डी.के.टी.ई. नारायणमळा प्राथमिक विद्या मंदिर व नांदणी येथील कै. शहा तु. ना. कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थी, विद्यार्थीनीनी शिक्षकांसमवेत स्पर्धेला भेट देऊन खेळाचा आनंद लुटला. तर नामांकित खेळाडूंनी सर्वांचे कौतुक करत मोलाचे मार्गदर्शन केले.