रत्नागिरी : सिद्धेश मराठे
भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी च्या वतीने 18 सप्टेंबर 2021 रोजी येथील भाट्ये बीचवर आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाचे आयोजन केले होते. लोकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची बीजे पेरणे आणि समुद्रकिनाऱ्यांवर पर्यावरणाचे नाजूक संतुलन अबाधित राखणे हे या उपक्रमाचा उद्देश होता.
श्रीमती संगीता कुमार, उपाध्यक्ष तटरक्षिका, रत्नागिरी, यांचे हस्ते ध्वज दाखवून भाट्ये बीच येथे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक उप समादेशक सचिन सिंग यांनी या मोहिमेबद्दल माहिती करून देताना समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व सांगितले. भारतीय तटरक्षक दल या निमित्ताने 2005 पासून भारतीय किनारपट्टीवर अशा कार्यक्रमांचे समन्वय करत आहे. याचे उद्दिष्ट केवळ समुद्रकिनारे स्वच्छ करणेच नव्हे तर किनारपट्टीचे क्षेत्र समुद्री प्रदूषण, कचऱ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सागरी परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी सामान्य लोकांमध्ये जागरूकता पसरवणे हे आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.
भारतीय तटरक्षक दल, सैन्य अभियंता सेवा, सागरी पोलीस, राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) आणि नगर परिषदेचे कर्मचारी स्वयंप्रेरणेने या कार्यक्रमात मोठ्या संख्येने आणि उत्साहात सहभागी झाले. प्रामुख्याने प्लास्टिकच्या बाटल्या, टिन, जाळी, दोरखंड, खाद्यपदार्थांचे रॅपर इत्यादी स्वरूपाचा एकूण 1.5 टन कचरा गोळा करण्यात आला.
भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक नीरज सिंग, उपमहानिरीक्षक दुष्यंत कुमार, कर्नल विश्वास पी यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला. उपक्रम पार पाडताना कोविड -19 च्या अनुषंगाने सर्व प्रतिबंधात्मक उपाय अंगिकारले होते.