इचलकरंजी:संजय आंबे
दि.२६ सुप्रसिद्ध पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित एक अतिशय तरल असा नाट्याविष्कार येथील जाणकार प्रेक्षकांना मराठी दिन महोत्सवाच्या निमित्ताने अनुभवावयास मिळाला. ‘अमृता साहिर इमरोज’ या सलग दीड तासाच्या प्रयोगातून एका उदात्त प्रेमाची कथा प्रेक्षकांना निखळ आनंद देऊन गेली. त्याचबरोबर ‘नली’ या एकल नाट्यविष्काराने एक अव्यक्त प्रेमाची ग्रामीण पार्श्वभूमीवरील शोकांत गोष्ट प्रभावीपणे सादर केली.येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि अ.भा. मराठी नाट्य परिषद शाखा इचलकरंजी या संस्थांच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिनानिमित्त आयोजित मराठी दिन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी हे नाट्यविष्कार पार पडले.
जळगावच्या परिवर्तन या संस्थेने सदरचे नाट्यविष्कार सशक्तपणे सादर केले.या नाटकातील अमृता प्रीतम यांची भूमिका हर्षदा कोल्हटकर या अभिनेत्रीने अतिशय चांगल्या प्रकारे सादर केली. यामध्ये शंभू पाटील यांनी साहिर, इमरोज आणि रसिक वाचक अशा विविध व्यक्तिरेखा वेगवेगळ्या ढंगात सादर केल्या. जयश्री पाटील यांनी वयस्कर अमृता प्रीतम यांच्या भूमिकेत या दोघांनाही चांगली साथ दिली शंभू पाटील लिखीत या नाटकाचे दिग्दर्शन मंजुषा भिडे यांनी केले असून, निर्मिती प्रमुख नारायण बाविस्कर व हर्षल पाटील आहेत. तांत्रिक बाजू राहुल निंबाळकर व मंगेश कुलकर्णी यांनी सांभाळली. विविध पातळीवर समकालीन अनेक गोष्टींचा वेध घेणारे हे नाटक लक्षणीय झाले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नली हा हळुवार आणि संवेदनशील एकल नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. हर्षल पाटील या ताकदीच्या कलाकाराने नलीची ही गोष्ट समर्थपणे प्रेक्षकांसमोर मांडली. खेडेगावामधील नली नावाच्या मुलीच्या आयुष्याची ही शोकांतिका होती. उच्च अधिकारी होऊनही काळजातलं नली विषयी हळवेपण जपणाऱ्या नायकाची तसेच रूढी परंपरा मान्य करीत पदरात पडणारं आयुष्य जगणाऱ्या दोन जीवांची ही कथा होती. कोणतीही तक्रार न करता शेवटी आत्महत्या करून आयुष्य संपवण्याचा मार्ग निवडणाऱ्या नलीची ही कथा प्रेक्षकांच्याही अंतकरणाला स्पर्श करून गेली. या कथेचे लेखन श्रीकांत देशमुख यांचे होते तर नाट्य रूपांतर शंभू पाटील यांनी केले होते. योगेश पाटील यांनी समर्थपणे या प्रयोगाचे दिग्दर्शन केले होते.
मराठी दिन महोत्सवाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा आणि दीपक निंगुडगेकर – कुलकर्णी यांच्या हस्ते कुसुमाग्रज आणि नटराज प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अतुल शहा, तुषार सुलतानपुरे यांच्यासह संयोजक पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष अशोक जैन यांनी स्वागत केले तर नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. मर्दा यांनी आशयपूर्ण प्रास्ताविक केले. याप्रसंगी बोहरा आणि निंगुडगेकर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. मर्दा फाउंडेशनचे विश्वस्त शामसुंदर मर्दा यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी आभार व्यक्त केले तर उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष आबाळे यांनी केले. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास इचलकरंजी त्याचबरोबर परिसरातील जाणकार रसिक उपस्थित होते.