एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरुन बाजूला सारता येणार नाही, कारण…

भाजपमधील सूत्रांची माहिती

मुंबई:प्रतिनिधि

दि:०४:जुलै: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, भाजपच्या गोटातून हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला केल्यास भाजपची विश्वासर्हता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे भविष्यात कोणताही प्रादेशिक पक्ष भाजपसोबत येण्याची तयारी दाखवणार नाही, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

ठाकरे गट आणि काँग्रेसकडून मुख्यमंत्री बदलाबाबत केल्या जाणाऱ्या दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र केले जाण्याची शक्यताही फारच कमी असल्याचेही भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले

 

राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाली आहे, सरकार स्थापनेत त्यांचे कोणतेही योगदान नाही. या गोष्टीची एकनाथ शिंदे यांना जाणीव आहे.याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीशिवाय खातेवाटप अंतिम होऊ शकत नाही. त्यामुळे सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांचे महत्त्व अबाधित राहील, असा भाजप नेत्यांचा होरा आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन कामकाजाला सुरुवात केली असली तरी अद्याप त्यांच्या पाठिशी राष्ट्रवादीच्या किती आमदारांचे पाठबळ आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, अजित पवार यांच्यासोबत आलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे जाणार नाहीत. सध्याच्या घडीला अजित पवार यांच्या पाठिशी ४३ आमदार, विधानपरिषदेतील ६ आणि तीन खासदारांचे पाठबळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकाराल विधानपरिषदेत नवे सभापती बसवता येतील, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले