वुमन्स डेव्हलपमेंटतर्फे प्रवीण होगाडे आणि निता ठाकूरदेसाई यांना संगीत सेवा पुरस्कार प्रदान

इचलकरंजी:प्रतिनीधी

दि:१३:जुलै:कोल्हापूर येथील वुमन्स डेव्हलपमेंट एज्युकेशन अँड पब्लिक वेल्फेअर फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल येथील गायक प्रवीण होगाडे आणि सौ. निता ठाकूरदेसाई यांना संगीत सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप शेंडे हे होते. देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना वुमेन्स फौंडेशन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी यांनी “कला क्षेत्राशी संबंधित उपक्रम संस्थेच्या वतीने नेहमी सुरू असतात आणि संस्थेतर्फे कलेच्या विकासासाठी जाणीवपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येतात” असे सांगितले. यावेळी बोलताना दिलीप शेंडे यांनी “वुमन्स फाउंडेशनने या दोन्ही कलाकारांना पुरस्कार देऊन इचलकरंजीतील संगीत क्षेत्राचा आणि पर्यायाने कलेचा गौरव केला आहे.” अशा प्रकारचे उदगार काढले.

 

यावेळी प्रवीण होगाडे आणि सौ. निता ऋषिकेश ठाकूरदेसाई यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. दोन्ही पुरस्कार प्राप्त गायकांनी याप्रसंगी गाणी सादर केली.

कार्यक्रमाच्या वेळी मुसळे, प्रवीण होगाडे आणि सौ. निता ठाकूरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले. येथील स्वानंदी सभागृहात सदरचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एसटी विभागाचे वरिष्ठ अधिकारी कुमार अग्निहोत्री, प्रतिष्ठित व्यापारी प्रकाश बर्गे, संजय होगाडे, प्रकाश रावळ, अंबरीश सारडा, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित ढवळे यांनी केले.