शिक्षण दान हे महत्त्वाचे दान होय – प्रांतपाल बोरसादवाला

इचलकरंजी:प्रतिनिधि

दि:२५:जुलै:शिक्षण ही आपल्या जीवनातील महत्त्वाची गोष्ट असून चांगले परिवर्तन घडविण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळेच शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून शिक्षण दान हे महत्त्वाचे दान आहे. म्हणूनच विद्यार्थी दत्तक योजना हा विद्यार्थ्यांसाठी एक कौतुकास्पद असा शैक्षणिक उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनीही शालेय अभ्यासाबरोबर अवांतर वाचन करणे, एखादी कला आत्मसात करणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पालकांनीही या सर्वांसाठी मुलांच्या पंखाना बळ द्यायला हवे” अशा आशयाचे उद्गार रोटरी प्रांत ३१७०चे प्रांतपाल नासीर बोरसादवाला यांनी काढले. 

येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी दत्तक योजना उपक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट लिटरसी प्रमोशन चेअरमन प्रा. डॉ. प्रशांत कांबळे पाहुणे या नात्याने उपस्थित होते. त्यांनीही यावेळी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बोरसादवाला त्याचबरोबर सर्व मान्यवरांच्या हस्ते इचलकरंजी शहर व परिसरातील विविध हायस्कूलमधील साधारणपणे शंभर विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य, स्कूल बॅग आणि गणवेश यांचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी क्लबच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष हसमुख पटेल यांनी केले तर प्रोजेक्ट कमिटी चेअरमन नागनाथ बसूदे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी प्रोग्राम कमिटी चेअरमन हिराचंद बरगाले यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तर लिटरसी कमिटी चेअरमन श्रीकांत राठी यांनी पाहुण्यांना भेटवस्तू प्रदान केली. कार्यक्रमाच्या शेवटी सेक्रेटरी सुरेश रोजे चौगुले यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय होगाडे यांनी केले. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात सदरचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास विद्यार्थी तसेच शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.