इचलकरंजी :प्रतिनिधी
येथील डिकेटीई शिक्षण संस्थेच्या कै. अनंतराव भिडे विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता विजय केटकाळे यांना इंग्लिश मिडीयम स्कुल असोशिएशन कोल्हापूर यांच्या वतीने यंदाचा जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
इंग्लिश मिडीयम स्कूल असोशिएशन कोल्हापूर यांचे वतीने दरवर्षी जिल्हास्तरीय ’आदर्श शिक्षक’ व ’आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार दिले जातात. चालू शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी कै. अनंतराव भिडे विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता विजय केटकाळे यांची ‘जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका’ म्हणून निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रात सौ. सुनिता केटकाळे यांचे योगदान अमुल्य असून विद्यार्थ्यांची सर्वंकष प्रगती व विकास यासाठी शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम वाखाणण्याजोगे आहेत. सौ. केटकाळे या अनंतराव भिडे विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे गेली 29 वर्ष कार्यरत असून मागील 10 वर्षांपासून मुख्याध्यापिका म्हणून ज्ञानदानाचे करीत आहेत. या पुरस्कार निवडीबद्दल सौ. केटकाळे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
इंग्लिश मिडीयम स्कूल असोशिएशन अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 325 शाळा संलग्न आहेत. या शाळांमधील एकूण 2500 शिक्षकांमधून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक व आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार निवडले जातात. पुरस्कार वितरण समारंभ राज्याचे शिक्षणमंत्री नामदार दिपक केसरकर, राज्यमंडळ पुणे अध्यक्ष शरद गोसावी व कोल्हापूर जिल्ह्याचे माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ.शेंडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा रयत शिक्षण संस्थेच्या कुंभोज येथील कर्मवीर शैक्षणिक संकुलातील कर्मवीर अध्यासन केंद्रात संपन्न होणार आहे.