इचलकरंजी: कयुम शेख
दि. २ – “इचलकरंजी शहरासाठीच्या सुळकूड पाणी योजने संदर्भातील अहवाल त्वरीत राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल” असे आश्वासन मा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या शिष्टमंडळास समक्ष चर्चेच्या वेळी दिले आहे. जिल्हाधिकारी यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये प्रताप होगाडे, मदन कारंडे, रविंद्र माने, अभिजित पटवा, विकास चौगुले, विजय जगताप, कॉ. सदा मलाबादे, वसंत कोरवी इ. समन्वय समिती सदस्य सहभागी होते.
मा. ना. मुख्यमंत्री यांनी इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजना अंमलबजावणी संदर्भात मा. खा. धैर्यशील माने यांनी दिलेल्या निवेदनावर दि. ११ सप्टेंबर २०२३ रोजी बैठक आयोजित केली होती. तथापि तत्कालीन मराठा आरक्षण विषयक तातडीच्या प्रश्नांमुळे ही बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर अडीच महिने उलटून गेले, तरीही ही बैठक पुन्हा ठरली नाही. तसेच यासंदर्भात पहिली बैठक दि. १ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी सुळकुड परिसरातील नागरीकांचा योजनेस विरोध आहे व योजना अंमलबजावणीसाठी आपले निवेदन प्राप्त झाले आहे. त्यामुळे राज्य सरकार कडे याबाबत मला अहवाल पाठवावा लागणार असून त्यानंतर शासन जो निर्णय देईल त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगितले होते तसेच इचलकरंजी शहरास पाण्याची गरज असल्याचेही चर्चेवेळी स्पष्ट केले होते. त्यानंतर ४ महिन्यांत कोणतीही हालचाल वा कार्यवाही झाली नाही. त्यामुळे यासंदर्भात पुढील आंदोलनपूर्व इशारा म्हणून कृति समितीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत वरीलप्रमाणे आश्वासन देण्यात आले आहे. तथापि गेल्या ४ महिन्यात राज्य सरकारकडे अहवाल कां पाठविला गेला नाही याबद्दल कोणतेही समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.
११ सप्टेंबरची बैठक रद्द झाल्यानंतर आज अखेर गेल्या अडीच महिन्यात संबंधित लोक प्रतिनिधी व मंत्री यांचेकडून यासंदर्भात कोणतेही प्रयत्न झाल्याचे दिसून आलेले नाही. याबद्दल शहरातील नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे. जनतेच्या या नाराजीचा स्फोट आणि उद्रेक होऊ नये, यासाठी लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकारने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी अपेक्षा कृति समितीच्या वतीने शेवटी व्यक्त करण्यात आली आहे.
काळम्मावाडी योजनेच्या शुभारंभ प्रसंगी विरोध होण्याची शक्यता – कोल्हापुर शहरासाठी पूर्णत्वास आलेल्या काळम्मावाडी नळ पाणी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. एकाच जिल्ह्यातील एका शहरास शासनाने पाणी दिले व दुसरीकडे दुसऱ्या मोठ्या शहरास पाणी देताना राजकीय विरोध होत आहे, त्याबाबत साधी बैठकसुद्धा शासनस्तरावर लावली जात नाही त्यामुळे ज्या दिवशी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री काळम्मावाडीच्या शुभारंभासाठी कोल्हापूरला येतील तेंव्हा प्रखर आंदोलन आवश्यक आहे अशी चर्चा शहरामध्ये सर्वत्र सुरु झालेली आहे