आधार बहुउद्देशीय सामाजिक,संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना आधार गौरव पुरस्कार प्रदान

इचलकरंजी:प्रतिनिधी –
दि .७:आपल्या सामाजिक कार्यकर्तृत्वाने सर्वांसमोर वेगळा आदर्श निर्माण केलेल्या आधार संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी लायब्ररीच्या माध्यमातून केले आहे. त्याचा लाभ सर्वच मुला-मुलींनी घ्यावा. त्याचबरोबर गोरगरीबांच्या घरात ईद साजरी व्हावी म्हणून आधार परिवाराने खीर साहित्य देऊन त्यांना खर्या अर्थाने आधार दिला आहे. समाजातील एकता, अखंडता कायम टिकून राहण्यासाठी अशा उपक्रमांची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द धन्वंतरी डॉ. एम. ए. बोरगांवे यांनी केले.
येथील आधार बहुउद्देशीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना आधार गौरव पुरस्कार प्रदान आणि रमजान ईद निमित्त आधार बैतुलमाल कमिटीच्या वतीने गरजू लोकांना खीर मसाला साहित्य वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. बोरगांवे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. ए. आय. वासिफ होते.
कृष्णानगर येथील आधार लायब्ररीत संपन्न कार्यक्रमात यावर्षी संस्थेच्या वतीने अ‍ॅड. लाजीम दस्तगीर मुजावर (न्याय), डॉ. अब्दुलरज्जाक इसाक इप्पेरी (वैद्यकिय), सरफराज शमशुद्दीन दाढीवाले (अभियंता), महंमदरफिक इब्राहीम मांगुरे (शैक्षणिक), अमीन अस्लम रमदान आणि अमन मुजीब कुट्टी (क्रीडा) यांना ‘आधार गौरव’ आणि फारुक अब्बास अत्तार यांना ‘उत्कृष्ठ संचालक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रा. वासिफ यांनी लायब्ररीच्या माध्यमातून आधार संस्थेने मुस्लिम समाजच नव्हे तर सर्वधर्मीय मुला-मुलींना शिक्षणाच कवाडे उघडली आहेत. वस्त्रनगरी इचलकरंजी आज वस्त्रोद्योगासह  एज्युकेशन हब बनत चालले आहे. आजच्या काळात आधुनिक शिक्षणाची कास धरण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कील डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपले करिअर घडवावे. शिक्षणासाठी जे जे सहकार्य लागेल ते आपण करु अशी ग्वाही त्यांनी दिली.
स्वागत महिला मंडळ अध्यक्षा सौ. साजिदाबानू मुजावर यांनी केले. प्रास्ताविकात आधार संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर यांनी संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आणि उपक्रमांचा आढावा घेतला. परवेज गैबान यांनी बैतुलमाल कमिटीच्या कार्याचा आढावा घेतला. आधार लायब्ररीचे अध्यक्ष मेहबूब मुजावर यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. फरीद मुजावर, युसूफ तासगावे यांनी मनोगत व्यक्त केले . सूत्रसंचालन बद्रेआलम देसाई व रफिक मुल्ला यांनी केले. आभार संस्थेचे उपाध्यक्ष हारुण पानारी यांनी मानले.
याप्रसंगी बैतुलमाल कमिटी अध्यक्ष लतिफ गैबान, ईद फेस्टिवलचे उपाध्यक्ष नुरमहंमद बागवान, सलीम बागवान, सलीम ढालाईत, दिलावर मोमीन, शकिल मुजावर,मेहबुब सनदी ,ताहेरा गैबान, फैरोजाबानू गैबान, माजी नगरसेविका बिलकिस मुजावर, फारुक आत्तार, सलीम म्हालदार, झकीअहमद मुजावर, इम्रानबागवान, वाजिद तासगांवे, रिजवाना गैबान आदी उपस्थित होते.