आंबेडकरी साहित्य: समतेच्या चळवळीचे प्रभावी व्यासपीठ – डॉ. चंद्रशेखर भारती
कल्याण:प्रतिनिधी
दि .२४ : “निसर्गाचा नियम असा आहे की अन्यायाची परिसीमा होते तेव्हा विद्रोह जन्म घेतो. शोषित, पिचलेला समाज जेव्हा अन्यायाविरुद्ध उभा राहतो, तेव्हा त्यातूनच आंबेडकरी साहित्याचा जन्म होतो. हे साहित्य म्हणजे माणसाच्या संवेदना, समतेचा संदेश आणि समाज परिवर्तनाची प्रेरणा आहे,” असे प्रतिपादन चौथ्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. चंद्रशेखर भारती यांनी केले.
प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धभूमी फाउंडेशन, वालधुनी, कल्याण येथे हे भव्य संमेलन पार पडले. संमेलनाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने व प्रकाशन समितीचे सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांच्या हस्ते झाले, तर संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक निरंजन पाटील यांनी अध्यक्षीय भूमिका बजावली. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अण्णासाहेब रोकडे आणि ॲड. प्रकाश जगताप हे उपस्थित होते.
संमेलनाच्या निमित्ताने डीएमसीटी हॉस्पिटलचे डॉ. रविंद्र जाधव यांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष निरंजन पाटील यांनी आंबेडकरी साहित्याचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, “परिवर्तनशीलता, विज्ञाननिष्ठा आणि मानवतावादी दृष्टिकोन ही आंबेडकरी साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. या साहित्याने समाजव्यवस्थेच्या पुनर्रचनेला बळ दिले आहे.”
उद्घाटक डॉ. प्रदीप आगलावे यांनी आंबेडकरी साहित्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना सांगितले की, “हे साहित्य केवळ मनोरंजनासाठी नसून प्रबोधनासाठी आहे. ते माणसाला आत्मसन्मान आणि माणूसपण मिळवून देणारे तत्त्वज्ञान आहे.”
या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक शिवा इंगोले, डी. एल. कांबळे, एन. एस. भालेराव, प्रा. आशालता कांबळे, कवी अरुण म्हात्रे, नवनाथ रणखांबे, गझलकार दत्ता जाधव, पाली भाषेचे विचारवंत अतुल भोसेकर, पत्रकार सुनील खोब्रागडे, डॉ. सुषमा बसवंत यांच्यासह अनेक साहित्यिक, कवी आणि विचारवंतांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन कवयित्री शुभांगी भोसले यांनी केले, तर संमेलनाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रा. युवराज मेश्राम यांनी व्यक्त केले. संमेलनाने आंबेडकरी विचारधारेच्या प्रसाराला नवसंजीवनी देत, समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी विचारमंथन घडवले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.