श्री आदिनाथ बँकेत नवे नेतृत्व :
जयकुमार उपाध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, तर निलेश बागणे व संतोष रायनाडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२५ : श्री आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लि., इचलकरंजी या अग्रगण्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर श्री. जयकुमार अजितकुमार उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेले उपाध्ये हे मागील चार वर्षांपासून उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या ‘Fit & Proper’ या पात्रता निकषांची पूर्तता केली असून B.Sc, DCS, G.D.C.&A, CAIIB अशी उत्तम शैक्षणिक पात्रता त्यांनी संपादन केली आहे.
बँकेच्या मासिक संचालक मंडळाच्या सभेमध्ये सक्सेशन प्लॅनिंग धोरणानुसार विविध पदांवर पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेच्या वाढत्या व्यापासोबतच रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँकेची कार्यक्षमता व सेवा गुणवत्ता अधिक बळकट करण्यासाठी दोन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या अंतर्गत, श्री. निलेश दादासो बागणे व श्री. संतोष भरमू रायनाडे यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Dy. CEO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांकडे कर्ज वितरण, वसुली आणि तांत्रिक सेवा-सुविधा या महत्त्वाच्या विभागांची स्वतंत्र जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. श्री आदिनाथ बँकेच्या या नव्या नेतृत्वामुळे बँकेची सेवा, कार्यक्षमता आणि विकास अधिक गतिमान होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.