एज्युकेशन सोसायटी कडवईच्या विद्यार्थ्यांचे संगमेश्वर तालुका ५३ व्या विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश
कडवई :दीपक तूळसणकर
दि.१४: एज्युकेशन सोसायटी कडवई अंतर्गत कार्यरत शाळांच्या विद्यार्थ्यांनी संगमेश्वर तालुका स्तरीय ५३ व्या विज्ञान प्रदर्शनामध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा व तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे.द कडवई इंग्लिश स्कूल या विद्यालयाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटामध्ये सहभाग नोंदविला होता. विज्ञान व तंत्रज्ञानाशी सुसंगत आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देणारे “झूम झूम” या नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन विद्यार्थ्यांनी तयार केले होते. या ॲप्लिकेशनमधील आशय व संकल्पना परीक्षकांसह प्रदर्शन पाहणाऱ्या प्रत्येकालाच विशेष भावली. ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन देणारे हे ॲप्लिकेशन आता जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार असून, या स्पर्धेत या प्रकल्पाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
कुमारी मरियम राहील जुवळे व कुमारी सारा समीर मोडक या विद्यार्थिनींनी आपल्या प्रकल्पाची अत्यंत प्रभावी मांडणी परीक्षकांसमोर केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रांजल मोहिते यांच्या संकल्पनेतून “झूम झूम” ॲप्लिकेशन साकार झाले असून, आयटी शिक्षिका श्रीमती करीना वागळे यांच्या कौशल्यपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना हे ॲप्लिकेशन विकसित करणे शक्य झाले. तसेच संस्था अध्यक्ष श्री. सादिक काझी यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवई या विद्यालयाने प्राथमिक गटामध्ये सहभाग घेतला होता. या प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी तंत्रस्नेही प्रतिकृती सादर केली होती. झोपाळ्याच्या हालचालीतून वीज निर्मिती करण्याची अभिनव संकल्पना या प्रतिकृतीत मांडण्यात आली होती. ही संकल्पना व प्रतिकृती परीक्षकांना विशेष आवडली असून, सदर प्रयोग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या प्रयोगाला प्राथमिक गटात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. कुमारी शरलीस तुलवे या विद्यार्थिनीने उत्कृष्ट सादरीकरण करून हे यश संपादन केले. या प्रयोगासाठी श्री. तोफिक शेख यांचे कौशल्यपूर्ण मार्गदर्शन लाभले.
या घवघवीत यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री. सादिक काझी, उपाध्यक्ष डॉ. अन्सार जुवळे, श्री. सिकंदर जुवळे, सौ. सीमा मोडक व श्री. रिजवान कारीगर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.