संगमेश्वर तालुक्यात उधार रकमेवरून वाद पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी
पीडित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागणार
संगमेश्वर: सचिन पाटोळे
दि.१०: संगमेश्वर तालुक्यातील एका नागरिकाची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. जवळच्या मैत्रीच्या विश्वासावर दिलेले उधार पैसे परत नाकारण्यात आल्याचा आरोप पीडित नागरिकाने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच वर्षांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीस कॅश स्वरूपात सुमारे दोन लाख रुपये उधार देण्यात आले होते. मात्र अलीकडे सदर रक्कम परत मागितली असता, संबंधित व्यक्तीने पैसे घेतल्याचेच नाकारत देण्यास स्पष्ट नकार दिल्याचा आरोप पीडित नागरिकाकडून करण्यात आला आहे.या प्रकरणी पीडित नागरिकाने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता, कॅश व्यवहाराचा कोणताही लेखी अथवा डिजिटल पुरावा उपलब्ध नसल्याने तक्रार नोंदवताना अडचणी येत असल्याचे समजते. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी पीडित नागरिकाने वरिष्ठ पोलिस अधिकारी, तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पुढे आली आहे.
या घटनेमुळे संगमेश्वर तालुक्यात कॅश उधार व्यवहारांबाबत नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून, विश्वासाच्या नात्यावर केलेले आर्थिक व्यवहार किती धोकादायक ठरू शकतात, याची पुन्हा एकदा जाणीव होत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी, तसेच उधार रक्कम नाकारण्याच्या अशा घटनांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी नागरिक व सामाजिक स्तरातून करण्यात येत आहे.पीडिताने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.