इचलकरंजीत शिव-शाहू विकास आघाडीची कॉर्नर सभा

रामराज्य हवे, पण चारित्र्यवान आणि स्वाभिमानी नेतृत्वच आवश्यक : रामहरी रुपन्नावर

इचलकरंजी: विजय मकोटे

दि. १२: खोटी आश्वासने, जनतेची दिशाभूल आणि सत्तेचा गैरवापर करून दमदाटी करणारे आता रामराज्याची भाषा करत आहेत. जनतेलाही रामराज्य हवे आहे; मात्र राजा श्रीरामाप्रमाणे चारित्र्यवान, गुणवान आणि छत्रपती शिवाजी महाराज व अहिल्यादेवी होळकर यांच्यासारखे स्वाभिमानी नेतृत्व हवे आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रामहरी रुपन्नावर यांनी केले.


शिव-शाहू विकास आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक १ मध्ये आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना सांगितले की, जनतेला न रुचणारी व प्रत्यक्षात न उतरणारी खोटी आश्वासने देऊन जनतेला फसवले जात आहे. सत्तेचा वापर करून रेल्वे, विमानसेवा व विमा कंपन्यांचे खाजगीकरण करून त्या काही मोजक्या उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. निवडणूक आयोग व न्यायव्यवस्थेवरही दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला.
जाती-पातीच्या नावावर समाजात तेढ निर्माण केली जात असेल तर सर्वसामान्य जनतेने काय करायचे, असा सवाल उपस्थित करून रुपन्नावर म्हणाले की, सत्ता कितीही मोठी असली तरी समाजावर अन्याय होता कामा नये. परिवर्तन घडवण्यासाठी ठाम निश्चय करून आक्रमकपणे समाजाच्या प्रश्नांसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. संधी पुन्हा-पुन्हा येत नाही. मतदानाचा निर्णय चुकीचा ठरला तर पाच वर्षे जनतेला पश्चात्ताप करावा लागतो. त्यामुळे हुकूमशाहीकडे झुकलेल्या व्यवस्थेला रोखण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी विचारपूर्वक मतदान करून चांगल्या विचारांच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार उदयसिंग पाटील यांनी सांगितले की, या भागात सर्व धर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने राहतात आणि एकोप्याने विकास साधला जात आहे. जाती-पातीच्या नावावर भेदभाव करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याच्याशी थेट सामना करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.सचिन राणे, रुपाली कोकणे व स्वाती लोखंडे यांनी राजकारणासाठी नव्हे तर समाजकारण व भागाच्या विकासासाठी शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. नितीन कोकणे, संजय बोगार्डे, सन्मुख बोळुगीड व अंजना सोळकुडे यांनीही आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली.या सभेस संतोष काळगे, रतन वाझे, रितेश बोळुगीड, अमर तोडकर, गणेश बोळुगीड, दीपक तोडकर, रोहित जानवेकर, अभिजीत सिंहासने यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.