प्रभाग क्रमांक १ – मलाबादेनगर येथे शिव-शाहू विकास आघाडीची कॉर्नर सभा
खोटी आश्वासने देणाऱ्यांना बाजूला सारून परिवर्तनासाठी मतदान करा : शशांक बावचक
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.१२: केंद्रात व राज्यात गेली ११ वर्षे सत्ता असूनही शहराचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. आता पुन्हा खोटी आश्वासने देऊन सत्ताधारी मते मागत आहेत. त्यामुळे विकास न करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करून शिव-शाहूंच्या विचाराने कार्यरत असलेल्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी केले.
प्रभाग क्रमांक १ मधील शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मलाबादेनगर येथे झालेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. बावचकर म्हणाले की, गेली १६ वर्षे शहराचा पाणी प्रश्न सुटलेला नाही. तरीही सत्ताधारी पुन्हा ‘पाणी आम्हीच देणार’ असे सांगत आहेत. मग आतापर्यंत हा प्रश्न सोडवताना त्यांचे हात कोणी बांधले होते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रत्येक कामात टक्केवारी वाढली असून सत्ताधाऱ्यांचे आमदार-खासदार असतानाही मूलभूत प्रश्न मार्गी लागत नाहीत. महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात आमदार-खासदारांचा वाढता हस्तक्षेप होत आहे. गटारीची कामे न करता केवळ बिले काढली जात आहेत. जनतेच्या कररुपाने जमा झालेला पैसा विकासाच्या नावाखाली मक्तेदारांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या खिशात जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता जनतेनेच परिवर्तनाचा निर्धार केला असून शिव-शाहूंच्या विचारांच्या उमेदवारांना मतदान करून या लढ्यात सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.
दत्ता माने यांनी सांगितले की, गेली १० वर्षे ‘शहराला पाणी देतो’ असे सांगून आमदार-खासदार जनतेची फसवणूक करत आहेत. पाणी योजना मंजूर असतानाही तिची अंमलबजावणी होत नाही. तरीही मुख्यमंत्री, आमदार व खासदार आम्हीच विकास केला, असे कोणत्या तोंडाने सांगत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बजरंग लोणारी यांनी मंजूर झालेली पाणी योजना पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत शिव-शाहू आघाडी गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला.
प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार उदयसिंग पाटील यांनी सांगितले की, भागातील विकासकामांसाठी टेंडर काढले जातात; मात्र एका नगरसेवकाने गटारीचे टेंडर काढून प्रत्यक्ष काम न करता पालिकेतून बिले काढली आहेत. विकास न करता बिले खाणाऱ्यांना आपण पुन्हा निवडून देणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांचा उर्मटपणा मोडून काढण्यासाठी आणि भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी सचिन राणे, रुपाली कोकणे, स्वाती लोखंडे व नितीन कोकणे यांनी सर्वांना सोबत घेऊन भागाचा विकास करण्यासाठी सेवेची संधी देण्याचे आवाहन केले. सभेस मधुकर मगदुम, दीपक कांबळे, रतन वाझे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.