कराटे प्रशिक्षणातून मुलींमध्ये मानसिक व शारीरिक सक्षमता : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे

कन्या सबलीकरण अंतर्गत कराटे प्रशिक्षणास भेट -जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची संकल्पना

   सांगली:अय्यान पटेल

दि.३१:मुलींची सुरक्षितता आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या कराटे प्रशिक्षणातून खऱ्या अर्थाने कन्या सबलीकरण होत आहे. कराटे प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये केवळ शारीरिक ताकदच नव्हे तर मानसिक सक्षमता आणि आत्मसन्मान वाढेल, असा विश्वास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी आज येथे व्यक्त केला.

       पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे कराटे प्रशिक्षण प्रात्यक्षिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव गि. ग. कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य गजानन पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

       जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून कन्या सबलीकरण अंतर्गत शालेय पातळीवर आत्मसंरक्षणाचे धडे देण्याच्या उद्देशाने शाळेमध्ये मुलींना कराटे प्रशिक्षण देण्यात येत असून, यातून शालेय स्तरावरच मुलींमध्ये आत्मनिर्भरतेची पायाभरणी केली जात आहे.

       या अनुषंगाने अध्यक्षीय मार्गदर्शनात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे म्हणाले, कराटे प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास, शिस्त, प्रसंगावधान आणि धाडस विकसित होत आहे. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक कणखतेतून स्वतःच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वतः घेण्याची जाणीव मुलींमध्ये निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

      जिल्हा न्यायाधीश एन. के. ब्रह्मे म्हणाले, कराटे प्रात्यक्षिक करताना विद्यार्थिनींनी तशी परिस्थिती प्रत्यक्ष निर्माण झाल्याचे चित्र मनात तयार करावे. या उपक्रमातून केवळ शाळेत कराटे शिकणे हा उद्देश नसून, आपल्या जीवनात यशस्वी व आत्मनिर्भर होण्यासाठी तन-मनाला स्वावलंबनाचे धडे देण्याचा आहे. मुली, युवतींवर हल्ला होण्याच्या घटना घडतात. असा प्रसंग उद्भवल्यास धैर्याने आणि कणखर मनाने सामोरे जाण्याचा हा धडा आहे. स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीप्रमाणे स्वतःची मदत स्वतः करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमची मदत करणार नाही, तोपर्यंत अन्य कोणीही तुमची मदत करणार नाही, त्यासाठी मनाला समर्थ बनवा, हे सांगताना त्यांनी कीचकवध नाट्यातील दाखला दिला.

       आजचा हा दिवस ऊर्जा व उत्साहाने भारलेला आहे. ही सकाळ स्मरणीय राहील, असे सांगून जिल्हा न्यायाधीश एन. के. ब्रह्मे म्हणाले, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडून अंमलात आणल्याबद्दल विशेष अभिनंदन करत कराटे प्रशिक्षणाचा हा उपक्रम राज्यभरात राबवला जावा, अशा शुभेच्छा दिल्या.

       जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, कराटे प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे धडे शालेय जीवनापासूनच विद्यार्थिनी गिरवत आहेत. शरीराबरोबरच मनाला कणखर बनवणे हे सुद्धा एकप्रकारे शिक्षणाचा भाग आहे. यातून तुम्ही एकट्या असताना स्वतःचे रक्षण करणे शक्य होणार आहे. विद्यार्थिनींनी येत्या आंतरराष्ट्रीय महिला दिनापर्यंत यलो बेल्ट मिळवण्यापर्यंत मजल मारावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

      जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभार बुडाला, असे सांगत स्वावलंबनाचे महत्त्व विषद करताना जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, तुम्ही जो विचार करता, तसे तुम्ही घडता. त्यामुळे यशस्वी होण्याचे स्वप्न बघा. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मनाला तसे प्रशिक्षण द्या. हाच यशाचा मूलमंत्र आहे. कराटे प्रशिक्षणातून स्वसंरक्षणाचा विचार विद्यार्थी दशेतच रूजला जाणार आहे. मात्र, शालेय पाठापुरता हा उपक्रम न ठेवता घरीही नियमित सराव करा, असा मौलिक सल्ला देताना त्यांनी यावेळी आटपाडीच्या एका विद्यार्थिनीचे उदाहरण दिले. शाळेतून घरी जाताना बसमध्ये तिचे साहित्य ओढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, कराटेचे धडे मिळाल्यामुळे तिने प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेतल्याचे सांगत मनाला कणखर बनवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

      मोहन गायकवाड म्हणाले, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून कन्या सबलीकरण अंतर्गत 500 पेक्षा अधिक संख्या असलेल्या 50 शाळांमध्ये दर शनिवारी सकाळी 8 ते 9 या वेळेत कराटे प्रशिक्षणाचा उपक्रम राबवला जात आहे. मुलींना दैनंदिन जीवनात स्वसंरक्षणाचे धडे या माध्यमातून दिले जात असून यातून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.    यावेळी प्रशिक्षण सुरेश चौधरी व स्वाती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींना आत्मरक्षणाची मूलभूत तंत्रे, संयम, स्वअनुशासन आणि निर्णयक्षमता यांचे प्रशिक्षण दिले जात असून, यावेळी विद्यार्थिनींनी कराटे प्रात्यक्षिक करून दाखवले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!