जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृतीवर भर : जिल्हाधिकारी अमोल येडगे
राज्य निवडणूक आयोगाच्या बैठकीत माहिती
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२: कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी प्रत्येक निवडणूक प्रक्रियेत नेहमीच उत्साहाने सहभाग नोंदवून संपूर्ण राज्यासमोर मतदानाच्या टक्केवारीचा एक आदर्श निर्माण केला आहे. याच परंपरेनुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही मतदानाचा टक्का उच्चांकी राहावा, यासाठी शेवटच्या टप्प्यात मतदार जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाकडून ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेची माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक योगेशकुमार, उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार उपस्थित होते.

मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करताना मतदारांना प्रत्यक्ष आवाहन करणे, शालेय विद्यार्थ्यांमार्फत पालकांना संदेश देणे, सार्वजनिक ठिकाणांहून उद्घोषणा करणे आणि मतदानाच्या बदललेल्या तारखांबाबत व्यापक प्रसिद्धी करणे अशा विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मतदान आता ५ फेब्रुवारी ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी होणार असून, या बदलाची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचल्याची खात्री करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच येत्या दोन दिवसांत सर्व मतदारांना मतदान चिठ्ठ्यांचे वाटप पूर्ण करण्यासाठी यंत्रणा अधिक गतिमान करावी आणि ज्या भागात मागील निवडणुकांमध्ये कमी मतदान झाले आहे, त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करावे, याबाबत सूचना केल्या आहेत असे त्यांनी नमूद केले. मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक किमान सुविधा मतदानापूर्वी २४ तास आधीच उपलब्ध करणे, मतदारांना निर्भयपणे मतदान करता येईल, असे पोषक वातावरण निर्माण करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सूक्ष्म नियोजन येत आहे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.