हरिद्वार: प्रतिनिधी
दि.४: श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक म्हणून कार्य केले. म्हणूनच आज नव्या पिढीसमोर भारतीय संस्कृतीची महानता टिकून आहे. त्यांच्या समाधी मंदिरामुळे भावी पिढ्यांसाठी एका प्रेरणास्थळ निर्माण झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

उत्तराखंड – हरिद्वार येथील श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभात मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. या सोहळ्यास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प.पू. जुनापीठाधिश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी, राम जन्मभूमी मंदिर न्यासाचे स्वामी गोविंददेव गिरीजी, पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल, स्वामी अखिलेश्वरानंदजी, स्वामी हरिचेतनानंदजी, स्वामी ललितानंद गिरीजी, महंत देवानंदसरस्वती, विनय रोहिला, प्रदीप बत्रा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय संस्कृतीतील संत परंपरा समाजाला जोडण्याचे, एकसंध ठेवण्याचे कार्य करते. तेच कार्य स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी भारत माता मंदिर स्थापनेतून सुरु केले. याशिवाय त्यांनी भारतीय सनातन संस्कृतीच्या जगभरात विखुरलेल्या प्रवाहांना एकत्रित आणण्याचे महत्वाचे कार्य केले. त्यांनी आपले सर्व आयुष्य मानवतेच्या कार्यासाठी वाहिले. जिथे कुठे आपत्ती, संकट आले, त्या ठिकाणी स्वामीजी धावून गेले. तिथे त्यांनी सगळे भेद बाजूला सारून मदतकार्य केले. यामाध्यमातून सनातन संस्कृतीची ओळख निर्माण केली. या प्रवासात त्यांनी कित्येकदा अनेक पदांचाही त्याग केला आणि आपल्या वैश्विक कार्याला पुढे नेण्यात धन्यता मानली. त्यामुळेच त्यांना जगभर अद्भूत व्यक्तित्व म्हणून सन्मान मिळाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आज जगभरातल्या अनेक संस्कृती नष्ट झाल्या आहेत. पण भारतीय सनातन संस्कृती आजही टिकून राहीली आहे असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सनातन विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगणारे आणि सर्वात प्राचीन असे आहेत. आता सरस्वती संस्कृतीच्या उत्खननातूनही या विचारांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे विज्ञान आणि इतिहास या दोन्ही कसोट्यांवर भारतीय जीवन पद्धती, सनातन संस्कृती समृद्ध असल्याचे सिद्ध झाले आहे. या भारतीय संस्कृतीने विविधता आत्मसात करून, तिच्या वैभवात भर घातली आहे. ही संस्कृती टिकवण्यात स्वामी सत्यमित्रानंदजी यांच्यासारख्या वाहकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. स्वामीजीनी आपल्या आचरण, कार्यातून या संस्कृतीचे पोषण केले. ती भावी पिढ्यांकडे सुपूर्द केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला मोठी गती मिळाली आहे. त्यामुळे आता भावी पिढ्याही या सनातन संस्कृतीशी स्वतःला जोडून घेऊ लागली आहे. त्यांनाही या संस्कृतीचा अभिमान वाटू लागला आहे. यामागेही या संत, महंताच्या कार्याचा बहुमुल्य आधार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.