कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी १.३० वाजेपर्यंत ४३.९५ टक्के मतदानाची नोंद

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची विविध मतदान केंद्रांना भेट

कोल्हापूर: रेणू पोवार

दि.७: जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया अभूतपूर्व उत्साहात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत मतदान प्रक्रियेची व व्यवस्थेची पाहणी केली.

जिल्हाधिकारी येडगे यांनी कागल तालुक्यातील कसबा सांगव, हातकणंगले तालुक्यातील येळगुड, रेंदाळ, पट्टणकोडोली तसेच करवीर तालुक्यातील मुडशिंगी येथील मतदान केंद्रांना भेट दिली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांवरील सुविधा, सुरक्षा व्यवस्था व मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची खातरजमा केली.

दुपारी १.३० वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण २ हजार ६९१ मतदान केंद्रांवर ४३.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील २३ लाख ४० हजार मतदारांपैकी ५ लाख २२ हजार ७३८ पुरुष मतदार, ५ लाख ५ हजार ८५९ स्त्री मतदार तसेच इतर ९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, एकूण १० लाख २८ हजार ६०६ मतदारांनी मतदान केले आहे.मतदान प्रक्रिया सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहणार असून उर्वरित मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!