बंजारा समाजाचे शीख धर्मातील महत्त्व

कोल्हापुर: रेणू पोवार

दि.९:भारतीय सामाजिक-आर्थिक इतिहासात बंजारा समाजाचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मध्य ‘युगीन काळात संपूर्ण भारतभर व्यापार, वाहतूक आणि पुरवठा व्यवस्था सांभाळणारा हा समुदाय केवळ आर्थिकच नव्हे, तर धार्मिक-सांस्कृतिक क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावतो. शीख इतिहासातील लखीशाह (लाखा) बंजारा यांचे योगदान हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते. श्री गुरु तेगबहादूर साहेब जी यांच्या शहीदीनंतर त्यांची केलेली सेवा, तसेच त्या काळातील बंजारा समाजाचे व्यापारी सामर्थ्य, हे दोन्ही घटक शीख-बंजारा संबंधांचे सशक्त द्योतक आहेत.

 

 लखीशाह बंजारा यांचे शीख समाजातील महत्त्व 

इ.स. १६७५ मध्ये मुघल सत्तेने श्री गुरु तेगबहादूर साहेबजी यांना दिल्लीत शहीद केले. त्या काळात भयावह वातावरण होते; कोणालाही गुरुजींच्या पार्थिवाला स्पर्श करण्याची हिंमत होत नव्हती. अशा वेळी लखीशाह बंजारा, जे एक नामांकित व्यापारी व कारवाँ प्रमुख होते, त्यांनी एकाच वेळी हजारो बैलगाड्या एकत्रित केल्या. आपल्या जीवाची पर्वा न करता गुरुजींचे पवित्र शरीर आपल्या गाडीत लपवून दिल्लीतील रायसीना परिसरात नेले.एकाच वेळी आलेल्या हजारो बैलगाड्या त्यांनी उडालेला धुराळा यामुळे त्यांच्या मनातील पवित्र कार्य कोणाच्या लक्षात आले नाही. नंतर आपल्या घराला आग लावून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले, जेणेकरून मुघल अधिकाऱ्यांना संशय येऊ नये. आजचे गुरुद्वारा रकाब गंज साहिब हे त्याच बलिदानाची साक्ष देणारे पवित्र स्थळ आहे.या ठिकाणी एक भव्य सभागृह आजही त्यांच्या नावाने उभे आहे.या घटनेमुळे लखीशाह बंजारा हे शीख परंपरेत त्याग, निष्ठा आणि मानवतेचे प्रतीक ठरले आहेत.

 

 श्री गुरु तेगबहादूर साहेबजींच्या कार्यात सहभाग 

गुरु तेगबहादूर साहेबजी हे धार्मिक स्वातंत्र्य, मानवाधिकार आणि सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्ते होते. काश्मिरी पंडितांच्या धर्मरक्षणासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली. लखीशाह बंजारा यांनी केलेली सेवा ही गुरुजींच्या मूल्यांचीच पुनरावृत्ती होती.धर्मापलीकडे जाऊन मानवतेसाठी उभे राहणे, ही शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून दिली.म्हणूनच शीख परंपरेत बंजारा समाजाला “सेवाभावी सहचर” म्हणून सन्मान दिला जातो.

 

 ३५० वर्षांपूर्वीचा बंजारा समाजाचे व्यापारी महत्त्व 

मुघल काळात बंजारा समाज हा उपखंडातील सर्वात मोठा स्थलांतरित व्यापारी वर्ग मानला जात असे. धान्य, मीठ, कापड, कच्चा माल आणि लष्करी पुरवठा हे मुख्य व्यवसाय. त्या काळातील असुरक्षितता आणि लुटालुट लक्षात घेऊन या समाजाने समुदायातून व्यापार केला.स्वसंरक्षण आणि त्यासाठी आवश्यक शस्त्रकला यामध्ये हा समाज पारंगत होता.भटकंती संदर्भातील रस्ते, जोखीम आणि प्रसंगी लढण्याचे कसब त्यांना अवगत होते. देशाटन करण्याची कला या समुदायाने विकसित केली होती.मोठ्या बैलगाड्यांच्या तांड्यांद्वारे (कारवाँ) हजारो किलोमीटरचा प्रवास केला जात असे. मुघल लष्कराचा अन्नपुरवठा प्रामुख्याने बंजाऱ्यांकडून होत असल्याची नोंद तत्कालीन प्रशासनिक कागदपत्रांत आढळते. दुष्काळी परिस्थितीतही अन्नधान्याची वाहतूक करून त्यांनी राजकारभार स्थिर ठेवला.

 

 तत्कालीन व्यापार व्यवस्था 

बंजारा समाजाची व्यापार व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध होती. प्रत्येक तांड्याला नायक, कारभारी आणि राखणदार असत. मार्ग, पाणवठे, विश्रांतीस्थळे यांची पूर्वनियोजित माहिती त्यांना असे. व्यवहार बहुधा विश्वासावर आधारित, पण ठराविक संकेत आणि मौखिक करारांवर चालत. ही व्यवस्था आजच्या लॉजिस्टिक्स सिस्टीमची आद्य आवृत्ती मानली जाते.त्यांच्या तांड्याची रचना व त्यातून कामाचे वाटप यामुळे अनेक वर्ष हा समुदाय शिस्तबद्ध व्यापारी समुदाय म्हणून सन्मानित केला जातो.या समाजाकडे असणाऱ्या दळणवळण,मनुष्यबळामुळे तत्कालिन राजकीय चौकटीत या समाजाला फार महत्व प्राप्त झाले होते.

 

 हिंदू समाजातील बंजारा समुदायाचे महत्त्व 

बहुसंख्य बंजारा समाज हिंदू परंपरेत मोडतो.सण, उत्सव, चालीरीती आणि त्यांचे वार्षिक नियोजन यामुळे या समाजाच्या मान्यतांना विविध समाजात प्रतिष्ठा प्राप्त होती.स्वतःची भाषा,संगीत,खानपान पद्धती,आयुर्वेद व औषध शास्त्राचे उत्तम जाण यामुळे त्यांना अन्य समाजात प्रतिष्ठा होती.त्यांनी देशभरच्या ग्रामीण-शहरी भागांना जोडण्याचे काम केले. स्थानिक बाजारपेठा, मंदिरे, यात्रास्थळे आणि राजकीय केंद्रे यांना आवश्यक वस्तू पुरवून सामाजिक एकात्मता वाढवली. देशभरातील स्वतःच्या समाजातील उत्सव सोबतच अन्य धर्मीयांच्या उत्सवाची माहिती व त्या दृष्टीचे बिनचूक वार्षिक नियोजनामुळे बंजारा समाज हा केवळ व्यापारी नसून, सांस्कृतिक दुवा ठरला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

 

 भाषा, पेहराव आणि अखिल भारतीय सूत्र 

बंजारा समाजाची गोरबोली (लामणी/लभाणी) ही भाषा संपूर्ण भारतात वेगवेगळ्या प्रादेशिक प्रभावांसह आढळते. हा एक अखिल भारतीय भाषिक सूत्र आहे. स्त्रियांचा रंगीबेरंगी पोशाख, भरजरी दागिने, पुरुषांचा साधा पण प्रवाससुलभ पेहराव,हे सर्व त्यांच्या स्थलांतरित जीवनशैलीशी सुसंगत होते. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत या समाजाने आपले वैशिष्ट्य, भाषा, पेहराव,खानपान यामध्ये एकसूत्री पण ठेवले.कोणत्याही ठिकाणच्या बंजारा समाजाच्या भाषा आणि राहणीमान हे एक दुसऱ्यांसोबत कितीही वर्ष विलग राहिले तरी बदलू न देण्याची हजारो वर्ष परंपरा त्यांनी जपली.अनेक धर्माचे अनेक पंथाचे व चालीरितीचे शासन आले तरी त्यांनी आपली संस्कृती जतन केली.त्यामुळे हा समाज सर्वकालीन समाज व्यवस्थेत देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या सन्मानाने आणि लढवय्या बाण्यामुळे तटस्थ आणि वेगळेपण अधोरेखीत करीत गेला.

 लाखा बंजारा यांचे व्यापारातील स्थान 

लखीशाह बंजारा हे केवळ धार्मिक सेवक नव्हते; ते त्या काळातील यशस्वी व्यापारी होते. दिल्लीसारख्या राजधानीत त्यांचे निवासस्थान आणि व्यापारी जाळे होते. तीन ते चार शतकांचा व्यापाराचा त्यांचा अनेक पिढयांचा अनुभव होता. आपल्या मेहनतीने, प्रामाणिकपणाने आणि व्यापार पूरक साहित्य – सुविधांनी त्यांनी गौरवशाली परंपरा निर्माण केली होती. स्वतःचा एक समुदाय,व्यापाराचा वकूब,शब्दाला जपण्याची स्थिरता,धर्माचा स्वाभिमान,व्यवहारातील पारदर्शिता, वक्तशीरपणा,आणि लढाऊ वृत्तीमुळे आदर युक्त दहशत या समाजाची तत्कालीन व्यवस्थेत होती. त्यामुळेच गुरुजींच्या पार्थिवाला सुरक्षितपणे हलवणे त्यांना शक्य झाले. 

 शीख आणि बंजारा समाजाचा संबंध 

लखीशाह बंजारा यांच्या कृतीमुळे शीख-बंजारा संबंध दृढ झाले. पुढील काळात अनेक बंजारा कुटुंबे शीख गुरुद्वारांच्या सेवेत सहभागी झाली. देशभरातील दोन्ही समाजांचा वावर.ठिकठिकाणी व्यापारासाठी व धर्मप्रसारासाठी जाणारे जत्थे व तांडे यातील स्थलांतर हा समान धर्म.विविध वातावरणात अस्तित्व टिकवण्याची परस्पर सांगड. लंगर व्यवस्था, प्रवासातील मदत, आणि आपत्कालीन सेवा या क्षेत्रांत दोन्ही समाजातील साम्य या समुदायाला सहजीवनासाठी उपयुक्त ठरला.त्यामुळे देशात या दोन्ही समुदायाने तत्कालीन व्यवस्थेत समान धर्मीय म्हणून मान्यता प्राप्त केले होती.ही व्यवस्था दोन्ही समुदायांच्या संबंधाला काळाच्या कसोटीवर सिद्ध करणारी ठरली आहे. 

 श्री गुरु ग्रंथ साहेब ग्रंथामध्ये आदराने उल्लेख 

गुरुजींच्या शहादतीमध्ये या समाजाने दाखवलेल्या अतुलनीय पराक्रमाचा उल्लेख शिखांच्या पवित्र श्री गुरु ग्रंथ साहेब जी ग्रंथात आहे.तथापि,गुरुमुखी या लिपीमध्ये असलेल्या या पवित्र ग्रंथात थेट “बंजारा” असा उल्लेख क्वचित आढळतो; मात्र सेवा, त्याग, समता आणि मानवता ही मूल्ये बंजारा समाजाच्या जीवनपद्धतीशी सुसंगत आहेत. शीख परंपरेतील सेवाभावात बंजारा समाजाचा आत्मा प्रतिबिंबित झालेला दिसतो. त्यामुळे शेकडो वर्षांपासून परस्परांच्या मान्यतेत व अस्तित्वात दोन्ही समाजाने एकमेकांचा आदर केला आहे.लखीशाह बंजारा यांचे बलिदान, बंजारा समाजाचे व्यापारी सामर्थ्य आणि शीख धर्माशी असलेले नाते हे सर्व भारतीय इतिहासातील सामाजिक ऐक्याचे उत्तम उदाहरण आहे. धर्म, जात किंवा व्यवसाय यापलीकडे जाऊन मानवतेसाठी उभे राहणे हीच या परंपरेची खरी देणगी आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!