महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जिवंत प्रतीक म्हणजे हस्तकला : खासदार धैर्यशील माने
चप्पल कारागिरांच्या नोंदणीसाठी ‘मिशन जीआय’- जिल्हाधिकारी अमोल येडगे.भौगोलिक मानांकन (GI) वापरकर्त्यांसाठी एकदिवसीय परिसंवाद
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१०: हस्तकला महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि कुशल कारागिरीचे जिवंत प्रतीक असून पारंपारिक हस्तकलेच्या प्रसिद्धीमधून ग्रामीण भागातील रोजगाराला मोठी चालना मिळेल, असे मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. कोल्हापूरमधील हजारो हस्तकला कारागिरांसाठी एकत्रित व्यासपीठ तयार करण्याच्या उद्देशाने, येत्या काळात दोन एकर जागेवर सुमारे २०० कोटी रुपयांच्या निधीतून प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न लवकरच सुरू केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारत सरकार विकास आयुक्त (हस्तशिल्प), पश्चिम विभागीय कार्यालय, मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय हस्तशिल्प विकास कार्यक्रमांतर्गत भौगोलिक मानांकन (GI) वापरकर्त्यांसाठी एकदिवसीय परिसंवाद आणि चर्चासत्र आज कोल्हापूर येथे उत्साहात पार पडले.

पश्चिम विभागात एकूण ६१ जीआय -नोंदणीकृत हस्तकला आहेत. कोल्हापुरी चप्पलापासून ते इतर पारंपरिक कलाकुसरांपर्यंत अनेक हस्तकलांचा यात समावेश आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते. परिसंवादात तज्ज्ञांनी जीआयचे महत्त्व प्रभावीपणे मांडत पारंपरिक ज्ञानाचे संरक्षण, हस्तकलेचे बाजारमूल्य वाढवणे आणि कारागिरांच्या उपजीविकेच्या संधी अधिकाधिक समृद्ध करणे याबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढील १०० दिवसांच्या विशेष ‘मिशन जीआय’ च्या माध्यमातून, कोल्हापुरातील सर्व चप्पल कारागिरांचे अर्ज भरून घेऊन जीआय प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला वेग देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला बेंगळुरू एनआयएफटीचे संचालक डॉ. यथिंद्र लख्खाना, मुंबईचे वरिष्ठ सहायक संचालक चंद्रशेखर सिंह, सहायक निदेशक पल्लवी जांभुळकर, मनोज राठी आणि हस्तशिल्प संवर्धन अधिकारी आकाश मुळीक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते कारागिरांना जीआय मानांकन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

कारागिरांना आपले अनुभव शेअर करण्याची, अडचणी मांडण्याची आणि पश्चिम विभागातील जीआय हस्तकलांच्या शाश्वत विकासासाठी नव्या संधी शोधण्याची सोनेरी संधी यातून मिळाली. याचवेळी खासदार आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पाच राज्यांतील विविध कुशल कारागिरांच्या हस्तकला वस्तूंचे विशेष प्रदर्शनाचे देखील भव्य उद्घाटन झाले. प्रदर्शनात कच्छ (राजस्थान), गोवा, मध्य प्रदेश, सावंतवाडी आणि तुळजापूर अशा विविध प्रांतांतील कारागिरांनी आपले स्टॉल्स लावले होते, ज्यात विविध कलाकृतींचे प्रदर्शन करण्यात आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.