कडवई–धामणी जि.प. गणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा झेंडा; दत्ताराम लाखण ३२६५ मतांनी विजयी

संगमेश्वर: सचिन पाटोळे

दि.१२: २०२६ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कडवई–धामणी जिल्हा परिषद गणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार तसेच कुचांबे गावचे सुपुत्र दत्ताराम लाखण यांनी ३२६५ मतांच्या भक्कम आघाडीने दणदणीत विजय मिळवत पक्षाचा झेंडा फडकवला. त्यांच्या विजयामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
निवडणूक प्रचारादरम्यान लाखण यांनी गावोगावी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. स्थानिक समस्या, विकासकामांची गरज तसेच तरुणांना संधी देण्याचे आश्वासन यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. कडवई–धामणी गणातील विविध गावांमध्ये त्यांच्या समर्थनार्थ मोठी लाट निर्माण झाली होती, ज्याचे रूपांतर ऐतिहासिक विजयात झाले.विजयानंतर बोलताना दत्ताराम लाखण म्हणाले, “हा माझा वैयक्तिक विजय नसून कडवई–धामणी गणातील प्रत्येक मतदाराचा विजय आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करणार आहे.”
निकाल जाहीर होताच कुचांबे गावासह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. स्थानिक नेते, पदाधिकारी व ग्रामस्थांनी लाखण यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कडवई–धामणी गणातील हा विजय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी महत्त्वाचा मानला जात असून आगामी काळातील स्थानिक राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.