कडवईत ठाकरेंच्या शिवसेनेचा झंझावात; संतोष थेराडे यांची विजयी हॅट्ट्रिक, दोन हजार मतांनी दणदणीत विजय

कडवई: नियाज खान

दि.१२: कडवई जिल्हा परिषद गटातील यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असताना ठाकरेंच्या शिवसेनेने दमदार शक्तिप्रदर्शन करत पुन्हा एकदा विजयाचा झेंडा रोवला. शिवसेनेचे उमेदवार संतोष भागोजी थेराडे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत विजयी हॅट्ट्रिक साधली. त्यांनी भाजपचे उमेदवार विनोद म्हस्के यांचा सुमारे दोन हजार मतांनी पराभव करत आपला मजबूत जनाधार पुन्हा सिद्ध केला.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच थेराडे यांनी आघाडी घेतली होती. पहिल्याच फेरीत त्यांना सुमारे ६०० मतांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर प्रत्येक फेरीत त्यांचे मताधिक्य वाढत गेले आणि शेवटपर्यंत निकालाबाबत कोणतीही शंका उरली नाही. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी वाढलेले मताधिक्य हा विजय अधिक भक्कम मानला जात आहे.
विरोधकांकडून थेराडे यांचा पराभव करण्यासाठी मोठी राजकीय मोर्चेबांधणी करण्यात आली होती. मात्र मतदारांनी ठाम पाठिंबा देत सर्व समीकरणे फोल ठरवली आणि थेराडे यांना भरघोस मतांनी विजयी केले. कडवई गटातील हा विजय ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला जात असून स्थानिक राजकारणात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विजयानंतर बोलताना संतोष भागोजी थेराडे म्हणाले, “हा विजय माझा नसून जनतेचा आहे. नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदारांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळाले. आता टीकेपेक्षा विकासकामांना गती देणे, प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि सर्वसमावेशक विकास साधणे हेच माझे प्रमुख लक्ष्य असेल.”
दरम्यान, विजयानंतर कडवई परिसरात शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला. स्थानिक नागरिक, पदाधिकारी व समर्थकांनी थेराडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.