सरपंच ते जिल्हा परिषद सदस्या; कसबा गटात विशाखा कुवळेकर यांचा दणदणीत विजय
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि.१२: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात ग्रामपंचायत ही पहिली पायरी मानली जाते, तर जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळख आहे. हीच यशस्वी राजकीय वाटचाल पूर्ण करत कडवई गावच्या सौ. विशाखा विजय कुवळेकर यांनी कसबा जिल्हा परिषद गटातून पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय विजय संपादन केला आहे. त्या आता रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नव्याने निवडून आलेल्या सदस्या म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
शिवसेना (ठाकरे गट) कडून उमेदवारी मिळालेल्या कुवळेकर यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. ग्रामपंचायत सरपंचपदावरून थेट जिल्हा परिषद सदस्यपदापर्यंत झेप घेणारे हे पंचक्रोशीतील दुर्मिळ उदाहरण ठरले असून त्यांच्या विजयाची तालुकाभर चर्चा रंगली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांमध्ये कसबा गट राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. पक्षनिष्ठा, कार्यतत्परता आणि जनसंपर्क यांचा विचार करून शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने त्यांच्यावर उमेदवारीची जबाबदारी सोपवली होती. निवडणूकपूर्व सर्वेक्षणातही त्यांच्या सामाजिक कार्याची आणि मतदारांशी असलेल्या दृढ नात्याची दखल घेण्यात आली होती.
सामाजिक उपक्रमांतून निर्माण झालेली विश्वासार्ह प्रतिमा, रात्रंदिवस केलेला प्रचार, कार्यकर्त्यांची मजबूत संघटना आणि मतदारांशी थेट संवाद यामुळे त्यांना मोठा पाठिंबा लाभला. युतीनंतर झालेल्या उमेदवार निवड प्रक्रियेतून त्यांचे नाव अंतिम करण्यात आले होते.
कडवई गावच्या रहिवासी असलेल्या विशाखा कुवळेकर या आता कसबा जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांचे पती विजय कुवळेकर हे स्थानिक पातळीवर प्रतिष्ठित उद्योजक म्हणून परिचित असून कुवळेकर कुटुंबाच्या सामाजिक बांधिलकीमुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
सरपंचपदापासून जिल्हा परिषद सदस्यपदापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी मानला जात आहे. कसबा गटाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत असून त्यांच्या विजयामुळे भागातील विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.