हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादुर शहिदी वर्षानिमित्त इचलकरंजी महापालिकेचा उपक्रम उत्साहात सुरू
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१४:महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी स्मरणार्थ वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचा इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त विद्या कदम, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार आणि प्रशासनाधिकारी इरफान पटेल यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची प्रभावी सुरुवात झाली.

शासनाकडून प्राप्त परिपत्रकानुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, त्याग, सहिष्णुता आणि धार्मिक ऐक्याची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.या अंतर्गत प्रभात फेरी, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा तसेच गुरु तेग बहादुर यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपर सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी माहितीपत्रके, घोषवाक्ये व शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाने सुचविलेल्या संकेतस्थळावरील मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी कार्यक्रमांचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.आयुक्त पल्लवी पाटील यांनी यावेळी शिक्षकांना संबोधित करताना हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व सामाजिक समरसतेचे संस्कार घडविण्याची महत्त्वपूर्ण संधी असल्याचे सांगितले. अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी २७ फेब्रुवारीपूर्वी सर्व उपक्रम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. उपायुक्त विद्या कदम यांनी प्रभात फेरी व स्पर्धांच्या नियोजनासाठी समन्वय साधण्याचे आवाहन केले. शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी कार्यक्रमांचे दस्तऐवजीकरण करून छायाचित्रे व अहवाल सादर करण्याबाबत मार्गदर्शन केले, तर प्रशासनाधिकारी इरफान पटेल यांनी प्रशासकीय मदतीची हमी दिली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना गुरु तेग बहादुर यांच्या त्यागमय जीवनाची प्रेरणा मिळणार असून धैर्य, सहनशीलता आणि मानवतेचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी शहरातील शाळा-महाविद्यालयांत माहितीपट व गीत प्रदर्शन करण्यात आले, तर शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांच्या सहभागाने प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या पुढाकारामुळे ‘हिंद-दी-चादर’ उपक्रम शहरातील शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी ठरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे प्रभावी पाऊल मानले जात आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.