जयगड येथे अमली पदार्थ विक्रीप्रकरणी एकास अटक; ७३४ ग्रॅम गांजा जप्त
रत्नागिरी: नियाज खान
दि. १४ : “मिशन फिनिक्स” अंतर्गत अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जयगड पोलीस ठाण्याने धडक कारवाई करत अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले. ही कारवाई रत्नागिरी पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या सूचनेनुसार जयगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दि. १३ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८.५५ वाजता जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान नांदिवडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ जे.एस.डब्ल्यू. लेबर कॉलनीच्या कंपाउंडलगत एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसला. पोलिसांनी पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडील सॅकमधून काळपट-हिरवट रंगाचा, पाने-फुले-बोंडे असलेला सुमारे ७३४ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ आढळून आला. जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे ₹२३,५२० इतकी आहे.
सदर इसमाने हा अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले असून जयगड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब) (ii) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जयगड पोलीस ठाणे करीत आहे.या कारवाईत पो.उनि. विलास दिडपसे, पो.हवा. निलेश कदम, पो.हवा. संतोष जाधव व पो.ज. प्रितेश लोटणकर यांनी सहभाग घेतला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.