मतदान न केल्याच्या रागातून तरुणास मारहाण; भाजप तालुकाध्यक्षासह पाच जणांविरोधात गुन्हा

संगमेश्वर:नियाझ खान 

दि .१७:  निवडणुकीत भाजपला मतदान न केल्याचा राग मनात धरून एका तरुणास मारहाण केल्याची घटना तालुक्यातील गोठणे पुनर्वसन येथे घडली. या प्रकरणी भाजप तालुकाध्यक्ष रूपेश कदम व हातीव गावचे सरपंच नंदकुमार कदम यांच्यासह पाच जणांविरोधात देवरुख  पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सुनिल शामराव पवार (वय २९, रा. गोठणे पुनर्वसन) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये रूपेश कदम, नंदकुमार कदम (दोघेही रा. हातीव), अक्षय शिंदे, अमित रेवाळे (रा. आंगवली) आणि प्रथमेश धामणस्कर (रा. देवरुख ) यांचा समावेश आहे.
फिर्यादीनुसार, १० तारखेला रात्री साडेआठच्या सुमारास सुनिल पवार हे आपले मित्र अंकुश उंडे व निलेश पवार यांच्यासह जेवणासाठी आर. के. हॉटेल येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या गावातील ओळखीचे प्रकाश उंडे यांनी निवडणुकीत मदत न केलेले मित्र हॉटेलमध्ये असल्याची माहिती दूरध्वनीवरून रूपेश कदम यांना दिल्याचे नमूद आहे.
त्यानंतर संबंधितांनी हॉटेल परिसरात येऊन सुनिल पवार व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या मारहाणीत किरकोळ दुखापत झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी Maharashtra Police Act, 1951 अंतर्गत कलम ३७ (१)(३) अन्वये मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी देवाख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत जाधव करीत आहेत.दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.