“मी दाऊदचा माणूस आहे” अशी धमकी; रत्नागिरीत दोघांवर गुन्हा
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि.१७: शिरगाव येथील खासगी जागेत अनधिकृतरीत्या घुसखोरी करून चारचाकी वाहन उभे करत जागामालकाला “उपट काय उपटायची ते, तू माझे काय वाकडे करणार, मी दाऊदचा माणूस आहे हे विसरू नको” अशी धमकी दिल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुष्कर माधव दामले (वय ५८, रा. ओंकार सोसायटी, सारस्वत कॉलनी, डोंबिवली) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अमेय श्रीकृष्ण दामले व रविंद्र वैजनाथ दामले (दोघेही रा. गायवाडी, शिरगाव, ता. जि. रत्नागिरी) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता फिर्यादी हे कोर्टातील कामकाज आटोपून शिरगाव येथील त्यांच्या मिळकतीत (सर्वे नं. ६२, हिस्सा क्र. २-१ (२-अ)) आले असता, तेथे अनधिकृतपणे Mercedes-Benz कंपनीची एमएच-०५-बीएम-८८०० क्रमांकाची चारचाकी उभी असल्याचे दिसून आले. संबंधित वाहन आरोपी अमेय दामले वापरत असल्याची माहिती फिर्यादींना असल्याचे नमूद आहे.
फिर्यादी जागी पोहोचताच आरोपी अमेय दामले व रविंद्र दामले हे वाहनाजवळ उभे होते. त्यावेळी अमेय दामले यांनी फिर्यादींना धमकी देत वाद घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर फिर्यादींनी त्याच दिवशी रात्री ९.२६ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या प्रकरणी गु.र.नं. ३७/२०२६ अन्वये Bharatiya Nyaya Sanhita, 2023 च्या कलम ३२९(३), ३५१, ३५१(२), ३५२ व ३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनेमागील कारण व पार्श्वभूमीचा तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.