सावर्डे पोलिसांची धडक कारवाई : अवैध मद्य वाहतूक करणारा एक जण ताब्यात
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि.२५:अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांविरोधात सावर्डे पोलिसांनी धडक कारवाई करत एका इसमाला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई-गोवा महामार्गावर करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या सूचनेनुसार सर्व पोलीस ठाण्यांना दक्षतेचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.गोपनीय माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावरील बहाळ फाटा उडाण पुलाजवळ दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सापळा रचण्यात आला. संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले. पोलिसांनी सुमारे १ लाख ८६ हजार ७२० रुपये किमतीचे विदेशी मद्य व ४ लाख रुपये किमतीची क्रेटा कार (क्रमांक GA-08-AN-3004) असा एकूण ५ लाख ८६ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी चालक समुंद्र सिंग थ्यामसिंग राठोड (वय २४, रा. मडलवाडा, आंगळ, पेडणे, गोवा, मूळ रा. राकला वाळा, रेखा की ढाणी, उककली, कुल्याना, जि. पाली, राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले आहे.याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सावर्डे पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.