अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी धाडीत 25 गॅस सिलिंडर, साहित्य जप्त

सांगली: अय्यान पटेल

दि.२७: सांगली व मिरज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध गॅस रिफिलिंगच्या  तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा व पोलीस विभागाने सांगली येथे धाडी टाकून 25 गॅस सिलिंडर व साहित्य जप्त केले. अवैध गॅस सिलिंडर रिफिलिंग करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कडक शास्ती करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी सांगितले.

       या कारवाईत सांगली मिरज रोडवरील विजयनगर परिसरातील हॉटेल सह्याद्रीच्या समोर अवैध गॅस रिफिलिंग चालू असल्याबाबत जिल्हा पुरवठा कार्यालयाने पोलिसांच्या सोबत धाड टाकून एकूण 16 गॅस व रि‍फिलिंगचे साहित्य जप्त केले. तसेच सांगली रेल्वे स्टेशन समोर 9 गॅस सिलिंडर व साहित्य जप्त करण्यात आले, असे एकूण 25 गॅस सिलिंडर व साहित्य जप्त करण्यात आले. पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रफुल्ल जाधव व श्रीमती माळी यांनी संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 317 नुसार गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा पुरवठा कार्यालय व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त मोहिमेंतर्गत सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके  यांच्या  पथकाने व सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने, पुरवठा निरीक्षक राजू कदम, मिरज पुरवठा निरीक्षण अधिकारी वर्षा कदम, मिरज पुरवठा निरीक्षक श्री. पाटील, तासगाव पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती माळी, खानापूर पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रफुल जाधव, ईश्वरपूर पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री मोरे, कवठेमंहकाळ पुरवठा निरीक्षक शुभम पुरी, पुरवठा निरीक्षक स्वप्निल फडतरे, जिल्हाधिकारी कार्यालय लिपिक विकास खुरुमूटे, पोलीस कर्मचारी बिरोबा नरळे, शुभांगी मुळीक व सुहेल कार्तियानी, रमेश बागडे, किशोर कांबळे यांच्या पथकाने अवैधरित्या गॅस रिफिलिंगच्या ठिकाणी धाडी टाकण्यात सक्रिय सहभाग घेतला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.