रत्नागिरीत खैराच्या झाडांची अवैध वाहतूक उघड; तीन जणांवर गुन्हा, ₹११.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी : नियाझ खान
दि.१० :जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत खैराच्या झाडांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे ११ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वृक्षतोड व वाहतूक रोखण्यासाठी विशेष गस्त व तपासणी मोहीम सुरू आहे.त्या अनुषंगाने दि. ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.१० वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना मौजे निवळी बावनदी, ता. व जि. रत्नागिरी येथील रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान MH-14-HG-7338 क्रमांकाची बोलेरो पिकअप आणि MH-08-AP-4339 क्रमांकाची टाटा योद्धा या दोन वाहनांमध्ये खैर जातीच्या झाडांची लहान-मोठ्या आकारातील एकूण १८१ नग लाकडे विनापरवाना वाहतूक करताना आढळून आली.
यावेळी वाहनांवरील चालक व संशयित आरोपी अजित गंगाराम चव्हाण (वय २६, रा. आंबडस, ता. खेड) अरबाज हमीद सुर्वे (वय ३४, रा. गवळीवाडी, घाणेखुंट, ता. खेड)अक्षय राजू चव्हाण (वय २८, रा. भिंगळोली, ता. मंडणगड) हे तिघे खैराची झाडे कुठेतरी तोडून चोरी करून त्यांची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी खैराची १८१ नग लाकडे तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण ₹११,७१,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३५/२०२६ दाखल करून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३१७(२), ३(५) तसेच भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(२)(ब) व ४२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली श्रे.पो.उनि. प्रशांत बोरकर, स.पो.फौ. सुभाष भागणे, पो.हेकॉ. नितीन डोमणे, पो.हेकॉ. भैरवनाथ सवाईराम व चा. पोकों. अतुल कांबळे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे करत आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.