सांगली:प्रतिनिधी
दि. 25, : बुब्बुळाची मागणी व पुरवठा यामधील तफावत भरून काढणे हा नेत्रदान पंधरवडा साजरा करण्याचा उद्देश आहे. जिल्हयात नेत्रदान चळवळ वाढीस लागण्यासाठी आता समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी नेत्रदान पंधरवड्याच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर साजरा करण्यात येत आहे. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे या नेत्रदान पंधरवड्याच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी नेत्रविभाग प्रमुख डॉ. शरद शेगांवकर, डॉ सुनिल खोत, डॉ. शैलजा सिन्नम व डॉ. गवळी उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी नेत्रदानाचे महत्व व नेत्रदानाबद्दल असलेली अंधश्रध्दा याबाबत माहिती दिली. तसेच भाग्यलक्ष्मी महिला ग्रुप सांगली या संघटनेमार्फत नेत्रदानासाठी होत असलेल्या चळवळीबद्दल त्यांचे कौतुक केले.
प्रास्ताविकात नेत्रविभाग प्रमुख शरद शेगांवकर यांनी सांगली जिल्ह्यामध्ये सन 2008 ते 2023 या कालावधीमध्ये 4 हजार 481 नेत्रबुब्बुळे गोळा करण्यात आली व त्यापैकी 2 हजार 243 नेत्रबुब्बुळे प्रत्यारोपण करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे आजतागायत 30 नेत्रबुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमप्रसंगी भाग्यलक्ष्मी महिला ग्रुप यांच्यावतीने 50 महिलांनी नेत्रदान व अवयवदान संकल्प केल्याचे फॉर्म भरून जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडे सुपुर्द केले.
या कार्यक्रमामध्ये नेत्रदात्यांच्या नातेवाईकांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ज्या लोकांना नेत्रदानामुळे दृष्टी प्राप्त झाली अशा लोकांनी या कार्यक्रमामध्ये कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवयवदान समन्वयक अविनाश शिंदे यांनी केले. आभार जिल्हा समन्वयक एड्स नियंत्रण कार्यक्रम विवेक सावंत यांनी मानले. कार्यक्रमास नोडल ऑफिसर जगन्नाथ बाबर, नेत्र चिकित्सा अधिकारी रमेश कोथळे, लेखापाल अभिनंदन पाटील तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व अधिष्ठाता कार्यालय अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.