शिरोळ : राम आवळे
दि.१० :ग्रामीण भागातील तरुणांमध्ये अफाट बुद्धिमत्ता असून, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते मोठी प्रगती करू शकतात. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही श्री दत्त समूहाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.
डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशन आणि आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दत्त कारखाना कार्यस्थळी क्वेस कॉर्पोरेशन लिमिटेड (Quess Corporation Limited) कंपनीसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात १८०० तरुणांनी सहभाग नोंदवला होता, त्यापैकी ६४८ तरुणांना हेल्पर, पर्यवेक्षक, इन्स्टॉलर, कनिष्ठ अभियंता आणि अभियंता या विविध पदांसाठी चांगल्या वेतनासह नोकरीची संधी मिळाली.
याप्रसंगी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले, “बेरोजगारीची समस्या गंभीर होत असताना, अशा रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून तरुणांना चांगल्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध असून, तरुणांनी या संधीचे सोने करावे.”
या मेळाव्यात रणजीत माने या युवकाला तब्बल ४.५ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले. तसेच, यशवंत सूर्यवंशी, पंकज तोडकर आणि प्रज्वल कोळी यांना उत्तम संधी मिळाल्याने त्यांचा विशेष सत्कार गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
ट्रस्टचे संचालक अंबादास नानिवडेकर यांनी यावेळी सांगितले की, “संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर रोजगार मिळवण्यासाठी मदत केली जाते. दरवर्षी कॅम्पस इंटरव्यू आणि रोजगार मेळावे आयोजित करून तरुणांना चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.”
कार्यक्रमाची सुरुवात स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमापूजनाने झाली. कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सत्कार गणपतराव पाटील आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक इंद्रजीत पाटील, संजय पाटील, ऍड. प्रमोद पाटील, विजय सूर्यवंशी, दरगू गावडे, भैय्यासो पाटील, तसेच क्वेस कंपनीचे जनरल मॅनेजर हरिप्रसाद बी. एस., मॅनेजर प्रदीप भंडारी, एच. आर. निलेश सांडभोर, एच. आर. प्रकाश कांबळे, आणि इन्स्टिट्यूटचे प्राचार्य गिरीश मालू, उपप्राचार्य, प्लेसमेंट ऑफिसर राजकुमार मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी दत्त संस्थेचे संचालक शेखर पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.