सांगली: अय्यान पटेल
दि.१२: सद्यस्थितीत जिल्ह्यात एलपीजीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. इंधन पुरवठा सुरळीत ठेवणेकामी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. गॅस एजन्सींची काटेकोर तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.
सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमिवर एलपीजीचा व इंधन पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने आयोजित एलपीजी कंपनीच्या विक्री अधिकारी / प्रतिनिधी यांच्या दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, पोलीस निरीक्षक बी. कुरळे, तहसीलदार लीना खरात, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ आदि उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणालीद्वारे आयओसीएलचे गौतम सागर, एचपीसीएलचे युवराज राणा व बीपीसीएलचे सिब्नीथ राणा आदि वरिष्ठ सेल्स ऑफिसर तसेच जवळपास ५० वितरक उपस्थित होते.जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याच्या अनुषंगाने आढावा घेऊन जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यात सध्या एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यानुसार एचपीसीएल कंपनीचा ८८८ मेट्रिक टन (सुमारे २३०० मेट्रिक टन साठा मार्गावर), बीपीसीएल कंपनीचा ९५७ मेट्रिक टन व आयओसीएल कंपनीचा ५२ मेट्रिक टन इतका एलपीजी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार आहे. ऑनलाईन बुकिंग केलेल्या सर्व ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलिंडरचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सर्व एलपीजी कंपन्यांच्या विक्री अधिकारी व प्रतिनिधींनी इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक ती दक्षता घेऊन कार्यवाही करावी. तसेच वितरण व्यवस्थेवर सतत लक्ष ठेवावे. जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनी ग्राहकांना वेळेवर व नियमानुसार सिलिंडर पुरवठा करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.घरगुती एलपीजी गॅसचे सुरळीत वितरण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता व फिरते पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाद्वारे जिल्ह्यातील गॅस एजन्सींची तपासणी सुरू असून आतापर्यंत २१ एजन्सींची तपासणी करण्यात आली आहे. तसेच तालुका स्तरावरही फिरती पथके स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गॅस एजन्सीकडून सिलिंडरचा गैरमार्गाने पुरवठा केल्याचे आढळल्यास अथवा घरगुती एलपीजीचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. एलपीजी गॅसबाबत कोणतीही तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक 18002333555 वर तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तक्रार नोंदविण्यासाठी 0233-2600500 या लँडलाईन क्रमांकावर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती दिली. तसेच, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊन गॅससाठी अनावश्यक गर्दी करू नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, सध्या जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन वितरण सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाचा साठा करण्यासाठी अनावश्यक गर्दी करू नये. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.