कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१२: पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया अधिक कार्यक्षम व जलद करण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) पुणे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित केले.
या प्रशिक्षण सत्रामध्ये पासपोर्ट पडताळणीची प्रक्रिया, अलीकडील तांत्रिक सुधारणा आणि अचूक व वेळेत पोलीस पडताळणी अहवाल सादर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पासपोर्ट प्राधिकरण आणि पोलीस विभाग यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.यावेळी प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडून पासपोर्ट सेवा अधिक पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच वेळेत आणि अचूक पोलीस पडताळणी ही पासपोर्ट वितरण प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून ती राष्ट्रीय सुरक्षेसोबतच नागरिकांच्या सोयीसाठीही आवश्यक असल्याचे सांगितले.
उप पासपोर्ट अधिकारी श्रुती पांडे यांनी पासपोर्ट सेवा कार्यक्रम (PSP) आवृत्ती 2.0 विषयी सविस्तर माहिती दिली. या नव्या प्रणालीमुळे डिजिटल सुविधा वाढल्या असून पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक झाली आहे, तसेच पोलीस यंत्रणेशी अधिक चांगला समन्वय साधला जात असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रक्रियेसंबंधी शंका, कागदपत्रे, सामान्य त्रुटी आणि अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.