घाटकोपर येथील घरफोडी प्रकरणातील ४ आरोपी जेरबंद; ११.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी: सचिन पाटोळे

दि.१२: जिल्ह्यातील घरफोडी, चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महमनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत घाटकोपर (मुंबई) येथील घरफोडी प्रकरणातील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे ११ लाख ९५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रंगारतळी बाजारपेठ येथील ओंकार ज्वेलर्स या दुकानात १८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे १.३१ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी दुकानाच्या शटरचे लॉक तोडून आत प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(६), ३३१(४) व ६२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात येत होता. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चार संशयितांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ,निशांत सुधीर आंबेकर (रा. बीएसटी कॉलनी, पंतनगर, घाटकोपर, मुंबई),मोईन शकील शेख (रा. गोपाल भवन, घाटकोपर, मुंबई),सुमित कुलदीप चुनियाना (रा. कोहिनूर सिटी, कुर्ला, मुंबई),आयुष जितेंद्र घागडा (रा. तावना पार्कफ्लोर, लक्ष्मण नगर, घाटकोपर, मुंबई)यांचा समावेश आहे.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले एक चारचाकी वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण ११,९५,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महमनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन देथे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, गणेश सावंत, दिपराज पाटील, योगेश नाईककर तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी सहभाग घेतला.सदर गुन्ह्याचा पुढील तपास घाटकोपर पोलीस ठाणे करीत आहे.