कोल्हापूर –विजय मकोटे
दि. 3 :श्री आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये उल्लेखनीय प्रगती साधत १ कोटी ५२ लाख रुपयांचा ढोबळ नफा नोंदवला आहे. बँकेकडे १७३ कोटी २७ लाख रुपये ठेवी तर १०० कोटी ६४ लाख रुपयांचे कर्जवाटप आहे. विशेष म्हणजे बँकेचा नेट एनपीए ०% असून, आर्थिक स्थैर्य व कार्यक्षमतेचा उत्तम नमुना बँकेने सादर केला आहे.
बँकेचे चेअरमन मा. श्री. सुभाष आ. काडाप्पा यांनी या यशाचे श्रेय सभासद व ग्राहकांच्या सहकार्याला दिले. त्यांनी सांगितले की, “रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सीआरएआर ९% पेक्षा जास्त असल्यास बँक सक्षम समजली जाते, आणि आमच्या बँकेचा सीआरएआर १६.७२% इतका आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.”
बँक डिजिटल सेवांच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून ग्राहकांसाठी यूपीआय, क्यूआर कोड पेमेंट, मोबाईल बँकिंग, ई-मेल सुविधा, ईसीएस, सीटीएस क्लिअरिंग, पॉस, एटीएम तसेच अत्याधुनिक वेबसाईटसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्राहकांचा डिजिटल व्यवहारांकडे वाढता कल लक्षात घेऊन बँकेने सायबर सुरक्षेच्या सर्व मापदंडांचे पालन करत उपाययोजना केल्या आहेत. बँकेच्या यशस्वी वाटचालीसाठी सहकार नेते मा. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा), मा. मंत्री प्रकाशराव आवाडे (आण्णा), मा. स्वप्नीलजी आवाडे व आमदार डॉ. राहुलजी आवाडे यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे चेअरमन काडाप्पा यांनी नमूद केले.यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन मा. श्री. बाळासो पा. चौगुले, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष मा. श्री. अभयकुमार आ. मगदूम, तसेच संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते. बँकेच्या उज्ज्वल प्रगतीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.