पत्रकार दिनानिमित्त ग्रामीण पत्रकारितेवर मंथन माहिती कार्यालयाचा संवाद उपक्रम

कोल्हापूर: रेणू पोवार

दि.६: दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ग्रामीण भागातील पत्रकारांशी विशेष संवाद साधण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील वारणानगर आणि कोडोली भेटीदरम्यान ग्रामीण पत्रकारितेचे महत्त्व, ‘स्मॉल स्केल’ वृत्तपत्रांचे योगदान आणि सध्याच्या युगातील ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

       ‘ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर’स् असोसिएशन’तर्फे पत्रकार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील के. सखाराम रामचंद्र बुरांडे ग्रंथालयात पार पडला. पत्रकार दिनाचा ऐतिहासिक संदर्भ, मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ व पत्रकारितेची लोकशाहीतील भूमिका याविषयी थोडक्यात माहिती देत समाजजीवन घडविण्यात मुक्त व जवाबदार पत्रकारितेचे स्थान उपसंचालक प्रवीण टाके यांच्या कडून अधोरेखित करण्यात आले. यावेळी ग्रामीण पत्रकारितेत कार्यरत आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजयकुमार पोतदार, डॉ. सागर बोराडे, दीपक ढवळे, धोंदिराम शिंदे, मकरंद बुरांडे, दीपक बळे, विजयकुमार पोतदार उपस्थित होते. सहभागी पत्रकारांनीही प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शासन–प्रशासन आणि माध्यम यांचा परस्पर समन्वय अधिक प्रभावी करण्याबाबत आपले मत मांडले.  शेवटी असोसिएशनच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि भविष्यात अशा प्रकारचे मार्गदर्शक कार्यक्रम सातत्याने घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.